युवकांचे लसीकरण झाले, तर कोरोनाच्या संसर्गाला आळा घालता येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाविद्यालयीन युवकांना कोरोनावरील लस देण्यासाठी आरोग्य विभाग आणि उच्च अन् तंत्र शिक्षण विभाग राबवणार ‘युवा स्वास्थ कोविड लसीकरण’ मोहीम !

राजेश टोपे

मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोरोनावरील लस त्याला थोपवू शकेल. सुरक्षिततेसाठी लसीकरण आवश्यक आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांचे लसीकरण झाले, तर कोरोनाच्या संसर्गाला आळा घालता येईल, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. महाविद्यालयीन युवकांना कोरोनावरील डोस देण्यासाठी राज्यात २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उच्च अन् तंत्र शिक्षण विभाग संयुक्तपणे ‘युवा स्वास्थ कोविड लसीकरण’ ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. २१ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपे यांनी याविषयीची माहिती दिली. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक अर्चना पाटील उपस्थित होत्या.

या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना कोरोनावरील डोस देण्यासाठी महाविद्यालयांकडे येत्या ३-४ दिवसांत विद्यार्थ्यांच्या नावाची सूची मागवण्यात आली आहे. डोस देण्यासाठी आवश्यक ते साहाय्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे डोस पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ते डोस केंद्रशासनाकडून उपलब्ध होत आहेत. यामध्ये चांगली कामगिरी करणार्‍या महाविद्यालयांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येईल.’’