गडचिरोली – जिल्ह्यातील अहेरी पोलीस उपविभागाच्या अंतर्गत येणार्या पेरमिली क्षेत्रात गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे विशेष अभियान राबवण्यात आले. पथकाच्या सैनिकांनी पेरमिली अरुण्य परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. त्या वेळी रात्री पहारा देत असतांना नक्षलवाद्यांचा पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला अटक करण्यात आली आहे. या नक्षलवाद्यावर सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या करणे, तसेच पोलीस ठाण्यावर आक्रमण करणे यांसारखे हिंसक गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, वर्ष २०२१ मध्ये बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडी यांच्या खुनाच्या प्रकरणी, तसेच बुर्गी पोलीस साहाय्य केंद्रावरील आक्रमणामध्ये नक्षलवादी मंगरू मडावी याचा समावेश होता. त्याच्यावर ३ जणांच्या खुनाचे प्रकरण आणि १ चकमक, असे एकूण ४ गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या नक्षली कारवाया आणि नक्षली प्रसारास आळा घालण्यासाठी सरकारने त्याला पकडून देणार्याला २ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. याव्यतिरिक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचे अन्वेषण येथील पोलीसदल करत आहे.