कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिवमध्ये जिल्हाबंदी !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १७ ऑक्टोबर – कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविक दर्शनासाठी पायी जाण्याची परंपरा आहे; मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने धाराशिवचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव जिल्हाबंदी घोषित केली आहे.

या कालावधीत काही भाविक पायी जाण्याची शक्यता असल्याने त्या मार्गावरील वाहतूक मार्गात पालट करण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव-भाग्यनगरकडे जाणारी वाहतूक उमगरा, औसामार्गे जातील. भाग्यनगर ते संभाजीनगर या मार्गावरील वाहतूक उमरगा, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा, बीडमार्गे संभाजीनगरकडे जातील. धाराशिव-सोलापूरकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गे, तर सोलापूरहून धाराशिवकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गेच जाईल.