नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची समीर वानखेडे यांच्या बहिणीची चेतावणी !

यास्मिन वानखेडे

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्याच्या प्रकरणी त्यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांच्यावर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी दिली आहे.

मलिक यांनी पत्रकार परिषदेत ‘फ्लेचर पटेल कोण ? त्यांचा वानखेडे यांच्याशी काय संबंध ? यापूर्वीच्या ३ धाडींमध्ये पंच म्हणून पटेल यांची उपस्थिती कशी ? पटेल यांच्यासह छायाचित्रातील ‘लेडी डॉन’ कोण ?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावर यास्मिन वानखेडे म्हणाल्या, ‘‘माझा भाऊ (समीर वानखेडे) योग्य कारवाई करत आहे; पण मलिक समाजाला चुकीची प्रेरणा देत आहेत. कुणाला अपकीर्त करण्याचे काम आम्ही करत नाही. जे चांगले काम करत आहेत, त्यांना अपकीर्त करू नका. अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवून मानहानीचा दावा प्रविष्ट केला जाईल’, अशी चेतावणी यास्मिन वानखेडे यांनी दिली आहे.

माजी सैनिक फ्लेचर पटेल म्हणाले, ‘‘शाहरूख खान, सलमान खान नव्हे, तर खरे हिरो वानखेडे आहेत.आज तरुणांनी वानखेडे यांचा आदर्श घेतला पाहिजे. सैनिक किंवा गणवेशधारी अधिकारी यांना त्यांच्या कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी मलिक यांच्या अनुमतीची आवश्यकता नाही. मलिक अमली पदार्थांच्या विरोधात असतील, तर त्यांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा. तुमच्याच भागात कुठे काय सापडते ?, ते मी तुम्हाला दाखवून देतो.’’