‘१९.१.२०२० ते २१.१.२०२० या ३ दिवसांत रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन, पूजा आणि प्रतिष्ठापना हे कार्यक्रम पार पडले. त्या वेळी मला देवीची मूर्ती उचलण्याची सेवा करायची होती. ही सेवा करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री भवानीदेवीची मूर्ती उचलण्याची सेवा मिळाल्यावर प्रथम ‘मूर्ती उचलण्यास जमेल का ?’, असा विचार मनात येणे, नंतर ‘सेवा देवीच करून घेईल’, असा विचार करून सेवा केल्यावर हात एकदाही न दुखणे
‘देवीची मूर्ती उचलण्याची सेवा करायची आहे’, असे समजल्यावर ‘माझा डावा हात दुखत आहे, तर मला मूर्ती उचलण्यास जमेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला; पण ‘एवढी मोठी संधी सोडायची नाही. सेवा देवीच करून घेईल’, असा विचार करून मी सेवा करण्यास होकार दिला. प्रत्यक्षात मला अधिक वजनाची वस्तू उचलता येत नाही आणि कधी उचललीच, तर माझा हात दुखतो. या तीन दिवसांत देवीची मूर्ती उचलण्याची सेवा करत असतांना माझा हात एकदाही दुखला नाही. ही सेवा करतांना ‘देवीच मला शक्ती देऊन माझ्याकडून सेवा करून घेत आहे’, असे मला जाणवले.
२. गाडीतून मूर्ती नेतांना गाडीत ‘प्रत्यक्ष देवीच बसली आहे’, असे जाणवणे
देवीला ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या चाचणीसाठी नेतांना गाडीत देवीच्या मूर्तीवरील कापड आणि फुले काढली होती. तेव्हा गाडीत ‘प्रत्यक्ष देवीच बसली आहे’, असे मला जाणवले आणि ‘देवीकडे सतत पहातच रहावे’, असे वाटत होते.
३. प्रत्येक वेळी देवीच्या मूर्तीचा भार न्यूनाधिक जाणवत असल्याने ‘साधकांना मूर्ती उचलतांना त्रास होऊ नये, यासाठी ‘देवी तिचे वजन न्यून करत आहे’, असे वाटून भावजागृती होणे
‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ चाचणीसाठी देवीची मूर्ती उचलतांना प्रथम ती पुष्कळ हलकी असल्याचे जाणवले. नंतर मिरवणुकीतून देवीचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर ‘ती पुष्कळ जड झाली आहे’, असे लक्षात आले. देवीच्या मूर्तीची स्थापना करतांना ती पुन्हा पुष्कळ हलकी झाली होती. तेव्हा ‘मूर्ती उचलतांना त्रास होऊ नये; म्हणून देवीनेच तिचे वजन न्यून केले आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
४. देवीला सजवण्यासाठी तिसर्या माळ्यावरील सदनिकेत नेतांना प्रार्थना केल्यावर बंद असलेले उद्वाहन (लिफ्ट)चालू होणे
देवीची मूर्ती सजवण्यासाठी ती तिसर्या माळ्यावरील सदनिकेत न्यायची होती. तेथील उद्वाहन (लिफ्ट) बंद असल्याने देवीची मूर्ती उचलून वर नेणे अशक्य होते. त्या वेळी आम्ही देवीला प्रार्थना केली, ‘भवानीदेवी, तूच आमची अडचण सोडव आणि उद्वाहन चालू कर.’ त्यानंतर ५ मिनिटांतच देवीच्या कृपेने उद्वाहन यंत्र चालू होऊन आम्ही देवीची मूर्ती सहजतेने वर नेऊ शकलो.
५. देवीचे आश्रमात आगमन झाल्यावर देवीची मूर्ती घेऊन आत जातांना ‘वेगळ्याच लोकात आहे’, असे जाणवणे
मिरवणूक झाल्यावर आम्ही गाडीतून देवीची मूर्ती उचलून रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षाकडे घेऊन जात होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर पुढे चालत होते आणि आमच्या हातात साक्षात् देवी होती. साधक दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत होते. तेव्हा ‘मी वेगळ्याच लोकात आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असा विचार मनात येऊन मला पुष्कळ आनंद झाला.
खरेतर आम्ही सर्वजण देवीची मूर्ती उचलण्याची सेवा करण्यास असमर्थ होतो. केवळ तिच्याच कृपेने आम्ही ही सेवा करू शकलो. आदिशक्ती भवानीदेवीने आम्हाला सेवेची ही संधी दिली आणि आमच्याकडून सेवा करून घेतली, त्यासाठी मी तिच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. देवीप्रसाद सालियन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक