ब्रिटनमध्ये गेल्या १० वर्षांत २० टक्के लोकांकडून मांसाहार ग्रहण करण्याच्या प्रमाणात घट

शाकाहारी लोकांमध्ये ३ टक्के वाढ !

शाकाहाराचे महत्त्व हळूहळू का होईना पाश्‍चात्त्यांना कळू लागले आहे, हेही नसे थोडके ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लंडन (ब्रिटन) – गेल्या १० वर्षांत ब्रिटनमध्ये २० टक्के लोकांनी मांसाहार ग्रहण करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प केले आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापिठातील एका संशोधनाद्वारे समोर आले आहे. कर्करोग, मधुमेह (टाईप-२) आणि हृदयाशी संबंधित वाढते रोग, या व्याधी त्यामागील मूळ कारण ठरल्या आहेत.

या संशोधनामध्ये म्हटले आहे की,

१. लोकांनी चांगल्या आरोग्यासाठी मांसाहार खाणे अल्प केले आहे किंवा त्याचे प्रमाण नगण्य ठेवले आहे. ‘रेड मीट’च्या (बकरी, मेंढी, डुक्कर आदी स्तनधारी प्राण्यांच्या मांसाच्या) विक्रीत फार घट झाली आहेे; परंतु चिकन आणि मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

२. वर्ष २००८ – ०९ मध्ये ब्रिटनमध्ये प्रती व्यक्ती प्रतिदिन १०३ ग्रॅम ‘रेड मीट’ वापरले जात होते. वर्ष २०१८ – १९ मध्ये हे प्रमाण प्रतिदिन २३ ग्रॅम प्रति व्यक्ती, इतके नोंदवण्यात आले आहे.

३. गेल्या एका दशकात ब्रिटनमध्ये शाकाहारी लोकांची संख्या २ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर गेली आहे. वर्ष १९९९ नंतर जन्मलेल्या लोकांमध्ये मांसाहार करण्याचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे.