रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीचे आगमन होण्यापूर्वी आणि झाल्यावर आलेल्या अनुभूती

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. ‘श्री भवानीदेवीचे आश्रमात आगमन होणार, म्हणजे हिंदु राष्ट्र लवकर येणार असून साधकांवर ईशकृपा होणार आहे’, या विचाराने पुष्कळ आनंद होणे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीचे आगमन होणार आहे’, हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. जेव्हा भगवान श्रीराम वानरसेनेसह रावणाच्या समवेत युद्धाला निघतो, तेव्हा त्याने श्री भवानीदेवीला आवाहन केले होते. भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला महाभारताच्या युद्धाच्या आदल्या दिवशी आदिशक्तीला आवाहन करण्यास सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री भवानीदेवीने त्यांना हिंदवी राज्य स्थापण्यासाठी तलवार दिली होती, तसेच आता ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी श्री भवानीदेवी आश्रमात येणार, म्हणजे हिंदु राष्ट्र लवकर येणार आणि साधकांवर ईशकृपा होणार’, या विचारानेच मला पुष्कळ आनंद झाला.

२. श्री भवानीदेवीचे आश्रमात आगमन झाल्यावर

२ अ. श्री भवानीदेवीवर पुष्पवृष्टी करायच्या वेळी सूक्ष्मातून अनेक देवता उपस्थित असल्याचे पाहून भावजागृती होणे : श्री भवानीदेवी आश्रमात आल्यावर तिच्यावर पुष्पवृष्टी करायची होती. त्या वेळी सूक्ष्मातून ‘अनेक देवता जमा झाल्या आहेत आणि त्यांची आकाशातही रांग लागली आहे’, असे मला दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली.

२ आ. देवीचे तेज डोळे दिपवणारे असून ते तेज सहन न होणे : प्रत्यक्ष देवीला पहात असतांना माझ्या अंगावर रोमांच येत होते. मला स्वतःभोवती उष्णता जाणवत होती. देवीचे तेज डोळे दिपवणारे होते. ते तेज सहन होत नव्हते.

२ इ. मूर्तीतील देवीतत्त्व जागृत करण्याच्या विधीच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीचेच एक रूप असून देवीच देवीतत्त्व जागृत करत आहे’, असे जाणवणे, त्या वेळी ध्यान लागणे आणि ध्यान संपल्यावर हलकेपणा जाणवणे : देवीच्या मूर्तीतील देवीतत्त्व जागृत करण्याचा विधी चालू होता. तो पहात असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीचेच एक रूप असून देवीच देवीतत्त्व जागृत करत आहे आणि उपचार करत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी देवीकडून प्रक्षेपित होणारी शक्ती मला सहन होत नव्हती. त्या वेळी माझे सतत ध्यान लागत होते. ध्यान संपल्यावर मला हलकेपणा जाणवत होता.

२ ई. आरतीच्या वेळी टाळ वाजवतांना ध्यान लागून ‘देवीच टाळ वाजवत आहे’, असे जाणवणे : देवीची आरती करतांना माझ्याकडे टाळ वाजवण्याची सेवा होती. त्यासाठी देवीच्या मंदिराजवळ जाताच ‘देहामध्ये वेगळीच ऊर्जा संक्रमित झाली आहे’, असे मला जाणवले. टाळ वाजवत असतांनाही ध्यान लागून ‘देवीच टाळ वाजवत आहे’, असे मला तीव्रतेने जाणवले. ध्यान लागल्यावर मी मागे-पुढे हालत होते; पण देवीने मला पडू दिले नाही.

२ उ. आरती म्हणत असतांना देवीची शक्ती प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत जाऊन ती सहन न होणे, प्रार्थना झाल्यावर शरीर दैवी शक्तीने भारित झाल्याचे जाणवणे आणि तेथे दैवी शक्तीचे क्षेत्र निर्माण झाले असल्याचे जाणवणे : आम्ही जसजशी आरती म्हणत होतो, तसतशी देवीची शक्ती प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत होते. शेवटी शक्ती वाढत जाऊन ती मला सहन होत नव्हती. तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे माते, तू देत असलेली शक्ती ग्रहण करण्याची शक्तीही तूच मला दे.’ त्या वेळी माझे पाय थरथरत होते. प्रार्थना झाल्यावर शरीर दैवी शक्तीने भारित झाल्याचे मला तीव्रतेने जाणवले. देवीपासून साधारण २ फूट आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंपासून १ फूट अंतरावर दैवी शक्तीचे क्षेत्रच निर्माण झाले होते. ते सूक्ष्मातून भूमीपासून वर निर्माण झाल्याचे दिसले. तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

२ ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून सगुण आणि साक्षात् देवीकडून निर्गुण शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईही देवीचे एक रूपच झाल्या आहेत. त्यांच्याकडून सगुण आणि देवीच्या मूर्तीतून निर्गुण शक्तीचे वातावरणात प्रक्षेपण होऊन आदिशक्ती स्वतः तेथे प्रगट झाली आहे’, असे मला जाणवत होते. साक्षात् आदिशक्तीचे स्थूल रूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि सूक्ष्म रूप देवी यांचे दर्शन झाल्याने एक वेगळाच उत्साह संचारल्याचे जाणवले.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक