मराठवाडा येथे ५ मुले नदीत बुडाली, चौघांचा मृत्यू !

प्रातिनिधिक फोटो

संभाजीनगर – मराठवाडा येथील ३ ठिकाणी झालेल्या घटनांत ५ मुले नदीच्या पात्रात बुडाली आहेत. यातील चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध चालू आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वानेगाव येथे ६ ऑक्टोबर या दिवशी आजीसमवेत गिरजा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली तिघे मुले बुडाली आहेत. यात कु. अभिजित पाचवने आणि कु. ऋषिकेश पाचवने या दोघा सख्या भावांचे मृतदेह सापडले असून कु. नीलेश शेजवळ याचा शोध चालू आहे.

सोनपेठ येथे नदीत बुडून बालकाचा मृत्यू !

सोनपेठ शहरातील फुकटपुरा भागात रहाणारा कु. शेख रेहान शेख आलीम हा ५ ऑक्टोबर या दिवशी मित्रांसमवेत वाण नदीच्या पात्रात पोहायला गेला आणि वाहून गेला आहे. काही युवकांनी पात्रात उतरून त्याचा शोध घेतला. एक ते दीड घट्यानंतर रेहान याचा मृतदेह एका बाभळीच्या बनात सापडला आहे.

किनवट येथे विद्यार्थी डोहात बुडाला !

नांदेड – किनवट शहरातील शांतीभूमी परिसरालगतच्या लोहमार्ग पुलाच्या पूर्वेकडील डोहात बुडून कु. जयराम तुप्पलवार हा बुडाला आहे. ही घटना ५ ऑक्टोबर या दिवशी घडली. कु. जयराम आणि कु. विनायक हे दोघे भाऊ नदीपात्रात आंघोळीसाठी गेले हेाते. जयराम याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. जयरामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.