आय.पी.एल्. सट्ट्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक बुकींना (सट्टेबाज) अटक !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, २७ सप्टेंबर – पुणे शहर पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या रात्री आय.पी.एल्.वर सट्टा खेळणार्‍या २ ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या २ आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अनुमाने ९३ लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जप्त केली आहे. गणेश भुतडा आणि अशोक जैन यांच्याकडील डायर्‍या, भ्रमणभाष आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात या सट्ट्याच्या व्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील एका ठिकाणी धाड टाकून गणेश भुतडा याला, तर मार्केटयार्ड येथून अशोक जैन या बुकीला अटक करून त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे. समर्थ आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.