मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याला चिरडले !

सोलापूर – मंगळवेढ्यातील गोणेवाडी येथे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी गणेश सोनलकर यांच्या अंगावर गाडी घालून वाळू तस्करांनी त्यांना चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश सोनलकर यांना गोणेवाडी येथे वाळू चोरी चालू असल्याची वार्ता समजली होती. त्यानुसार कारवाईसाठी गेले असता वरील प्रकार घडला.

सोलापूर जिल्ह्यात अद्याप वाळूचे कुठलेही लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे प्रतिदिन येथील भीमा नदीच्या पात्रात राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा चालू असतो. वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणारे पोलीस आणि महसूल कर्मचारी यांच्या अंगावर थेट गाडी घालण्याची त्यांची नेहमीची पद्धत झाली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाल्याचे समजले नाही.