वर्षभरात स्वतःची प्रगती न होण्यामागील कारणांचे अंतर्मुखतेने चिंतन करा आणि पुढील प्रगती होण्यासाठी व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करा !

आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिलेल्या साधकांसाठी सूचना

‘अहं अल्प झाल्यास ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येते. पुढे त्याचाच अहं झाल्यामुळे काही जणांची पातळी घसरते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘या वर्षी काही साधकांची आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली आहे. साधक काही काळ प्रयत्न करतात; पण वर्षभर अपेक्षित असे प्रयत्न न केल्याने ते साधनेच्या त्याच टप्प्यात रहातात. ‘माझे प्रयत्न चांगले होत आहेत’, असा साधकांचा विचार असल्यास त्यांच्यात अल्पसंतुष्टता निर्माण होते आणि अहं वाढून घसरण होऊ लागते. ‘या वर्षभरात माझी आध्यात्मिक पातळी का वाढली नाही ? ‘माझी साधना चांगली चालू आहे’, अशा भ्रमात मी होतो का ?’, याचे साधकांनी अंतर्मुखतेने चिंतन करावे. आपले साधक-कुटुंबीय आणि सहसाधक यांचेही साधनेत साहाय्य घ्यावे.

गुरूंच्या कृपेमुळे मिळालेली ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीची अमूल्य भेट टिकवून ठेवणे, तसेच पुढील प्रगती करणे, यांसाठी साधकांनी वर्षभर सातत्याने प्रयत्न करायला हवेत.

साधकांनो, ‘अध्यात्म’ हे अनंताचे शास्त्र असल्याने अल्पसंतुष्ट न रहाता व्यष्टी आणि समष्टी साधनेचे पुढच्या पुढच्या टप्प्याचे प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)