रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता यांचे आगमन !

डावीकडून शिवडमरूचे वादन करतांना भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा, चिपळ्यांचे वादन करतांना सौ. अनन्या सेठी, परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची पाद्यपूजा करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ, त्यांच्या शेजारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि वेदमंत्राचे पठण करतांना पुरोहित

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वाचन करण्यात येणार्‍या महर्षि भृगु यांच्या संहितेच्या नाडीपट्टीचे आणि भृगुगीतेचे येथील सनातनच्या आश्रमात १८ मे या दिवशी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी शुभागमन झाले.

महर्षि भृगु यांच्या संहितेचे वाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याकडे नाडीपट्टी आणि शंख, तर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे भृगुगीता सोपवली. त्यानंतर आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सौ. अनन्या सेठी यांचे पाद्यपूजन केले. या वेळी महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले अन् त्यांचे औक्षण केले. हे पूजन करत असतांना भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी शिवडमरूचे, तर सौ. अनन्या सेठी यांनी चिपळ्यांचे वादन केले. या वेळी सनातन साधक-पुरोहित वेदपाठशाळेचे वेदमूर्ती केतन शहाणे गुरुजी आणि इतर पुरोहित यांनी वेदमंत्रांचे उच्चारण केले. महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता हे दोन्ही परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या खोलीमध्ये असलेल्या देवघरात ठेवण्यात आले. त्यानंतर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आणि भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी त्यांचे पूजन करून नमन केले.

साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या केलेल्या जयघोषाने वातावरणात चैतन्य पसरणे

महर्षि भृगु यांच्या संहितेची जीवनाडीपट्टी आश्रमाच्या आवारात आल्यानंतर वेदमूर्ती श्री. केतन शहाणेगुरुजी यांनी तीनदा शंखनाद केला. त्यानंतर स्वागतासाठी उपस्थित असलेल्या साधकांनी श्री श्री जयंत बाळाजी आठवले – जय गुरुदेव असा जयघोष केला.

वैशिष्ट्यपूर्ण

भृगुगीता ही इतिहासात पहिल्यांदा भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी भृगुऋषि यांच्या अनुसंधानात राहून २ पूर्ण रात्री जागरण करून लिहून पूर्ण केली आहे. त्यामध्ये २१४ अध्याय आहेत. अशा या भृगुगीतेचे आगमन सनातनच्या आश्रमात झाले आहे, तसेच त्यासह १०८ नावांची भृगुनामावलीही लिहिली असून तिचेही आगमन आश्रमात झाले आहे.

क्षणचित्रे

१. नाडीपट्टी आगमनाच्या वेळी आश्रमातील वातावरण कृतज्ञताभावमय झाले होते.

२. आगमनाच्या वेळी भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी गुरु मेरी पूजा, गुरु परब्रह्म… हा संत कबीर यांचा दोहा असलेली ध्वनीफीत लावली होती. त्यामुळे उपस्थित साधकांमध्ये परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रती शरणागत भाव जागृत होऊन भावाश्रू दाटून आले होेते.

३. भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांनी ध्यानमंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले आणि ध्यानमंदिरातील शिवडमरूचे वादन केले.