हिंदु शक्ती !

संपादकीय

उत्तरप्रदेशमध्ये सध्या योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. या सरकारने नुकतेच त्याच्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले. या सरकारच्या पूर्वी तेथे सत्तेत असलेल्या समाजवादी पार्टीच्या काळात जे अराजक माजले होते, त्याला आळा बसला आहे, असे आपण म्हणू शकतो. मुख्यमंत्री श्री. आदित्यनाथ यांनी प्रथम कार्यालयीन शिस्तबद्धता आणण्याचे धोरण आखले. त्यात त्यांना चांगलेच यश मिळाले असले, तरी त्यांच्या समोर मोठी आव्हाने उभी करण्याची समाजकंटकांची विघ्नसंतोषी वृत्ती नष्ट झालेली दिसत नाही. राज्यातील बुलंदशहर येथील जहांगीराबाद क्षेत्रामधून दोन आठवड्यांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले. नंतर तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचे तिने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून समोर आले. या तरुणीने न्यायदंडाधिकारांच्या समक्ष अब्बास मिर्झा नावाच्या व्यक्तीवर अपहरण, बलात्कार, जबरदस्तीने विवाह करणे आणि धर्मांतर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. पोलिसांनी अब्बास याला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत बुलंदशहरमध्ये लव्ह जिहादची ४ प्रकरणे उघड झाली. एकूणच कायदा आणि सुव्यवस्था यांची समस्या निर्माण करण्याचा समाजकंटकांचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट करून राज्याला आदर्श राज्य बनवण्याच्या प्रयत्नांत असतांना समाजकंटकांनी त्याला न जुमानता महिलांच्या संदर्भात समस्या निर्माण करणे, हे हेतूपुरस्सर केलेले कृत्य नाही कशावरून ? मुख्यमंत्र्यांनी सडकसख्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पथकांची उभारणी केली. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. राज्यातील जनतेचा विश्‍वास संपादन करण्याची ही कृती मुख्यमंत्र्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली. सर्वच राज्यांत एखादा योगी मुख्यमंत्री असावा, अशी कोणीतरी टिप्पणीही केली. निस्वार्थपणे जनसेवा करणे केवळ योग्यालाच शक्य आहे, अशी जनतेमध्ये भावना असल्याचे हे द्योतक आहे. मुख्यमंत्री भगवी वस्त्रे परिधान करतात. विरक्तीचे ते लक्षण आहे. भगवा आतंकवाद असे काहीतरी बरळून हिंदूंची नालस्ती करणार्‍यांना ही चपराक नव्हे का ? भगव्याची जनसेवा विरोधकांना कधी शक्य होईल का ? मुख्यमंत्री स्वतः जनतेला भेटतात, शासकीय अधिकार्‍यांना बैठकांमधून कर्तव्याची जाणीव करून देतात. त्यांचा जनसेवेविषयीचा वैयक्तिक कळवळा, हेच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे रहस्य आहे. भगव्या आतंकवादाची आवई उठवणारे आता कुठे दिसेनासे झालेत, ते कळत नाही. नाही म्हटले, तरी भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग सहजतेने करणारे काँग्रेसी नेते पी. चिदंबरम् त्यांच्या निवासस्थानावर पडलेली केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआयच्या) धाड निस्तारत आहेत.

असो ! हिंदू ही एक शक्ती आहे. तिला हिणवल्यास ती कोणतीही दिशा पकडते आणि वाईट परिणाम दिसायला लागतात.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे विरोधक !

हिंदु राष्ट्राची स्थापना या संकल्पनेची पाळेमुळे देशात चांगलीच खोलवर गेली आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना आता शक्य आहे, असे कोणीतरी म्हणालेही ! हिंदु राष्ट्र हे शब्द कानावर आले की, काही जणांना पोटशूळ उठतो. हिंदु राष्ट्र म्हणजे विश्‍वाचे कल्याण चिंतणारी व्यवस्था ! ज्यांना कल्याणकारी जीवन जगावेसे वाटत नाही, ज्यांच्याकडे वैचारिक क्षमता नाही आणि ज्यांच्यावर राजकीय प्रभाव आहे, असे काही महाभाग हिंदु राष्ट्र संकल्पनेला विरोध करतात. अर्थात् त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. जसे की काँग्रेस पक्ष सर्वच आघाडीवर नेस्तनाभूत होत असला, तरी पडलो तरी नाक वर या उक्तीप्रमाणे पुढे पुढे करतच असतो, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र संकल्पनेचे विरोधक स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी काहीतरी बरळतात. हिंदुत्वनिष्ठांनी मात्र मागे वळून न पहाण्याचा निश्‍चय केला आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव नुकताच पार पडला. त्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती अभियान कार्यक्रम देशभर राबवण्यात आला. हिंदुत्वनिष्ठांनी हे अभियान बैठका, सभा, दिंड्या, फलक यांच्या माध्यमातून अप्रतिमपणे राबवले. हिंदु राष्ट्र संकल्पनेला त्यांचा असलेला पाठिंबा त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. कोणीही सुज्ञ व्यक्ती या संकल्पनेला पाठिंबा देणार, हे स्पष्ट आहे. उत्तरप्रदेशमध्ये अराजक का माजले होते ? जनकल्याण ही संकल्पना किंवा विचारधारा त्या राज्यात कधी मूळ धरू शकली नाही. नेहमी होणारे दंगेधोपे केवळ मिटवायचे, एवढेच काय ते तेथे होत होते. दंगे कुणामुळे होतात ? का होतात ? हा वैचारिक भाग तेथे होत असतांना कधी अनुभवले नाही. दंग्यांचे बळी हिंदू जनता होती, हा भाग अभ्यासातून स्पष्ट होत होता, तरीही त्याचा परिणाम तत्कालीन सरकारवर कधी झाला नाही किंवा त्यावर तोडगा काढण्याचे काही प्रयत्न झाले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सत्तांतर होऊन योगी आदित्यनाथ यांच्याकडे सत्ता येणे, हा दैवी संकेत होता, असे म्हणता येते. आता मुख्यमंत्री ज्या आत्मियतेने आणि दृढ निश्‍चयाने सेवा करत आहेत, ते पहाता त्यांना जनकल्याणच साधायचे आहे, हे उघड होते आणि म्हणून ते हिंदु राष्ट्र संकल्पनेचे उच्चारण करतात. सर्वांचे कल्याण होत असेल, तर या संकल्पनेला विरोध कशाला ? असा प्रश्‍न ते विचारतात. विरोधकांकडे त्याचे उत्तर नाही. हिंदू वेचून काढून मारले जातात. हिंदूंनी या देशात खूप भोगले आहे. हिंदु महिलांचे अपहरण, धर्मांतर, बलात्कार, हत्या हा त्याचाच भाग आहे. वर उल्लेख केलेला भागही तसाच हिंदूंच्या भोगाशी निगडित भाग आहे. हे का होते ? असहय्य यातना भोगणार्‍या हिंदूंकडे कुणी आपुलकीने पहात नाही, हिंदूंचे भोग चालूच आहेत, म्हणून हिंदु राष्ट्र हवे आहे. हिंदूची मानसिकता व्यापक आहे. स्वतःचे कल्याण साधण्याआधी तो इतरांचा विचार करतो, हे त्याचे गुणवैशिष्ट्य किती जणांना माहीत आहे ?