महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या दोन वर्षांत राज्यसेवा पूर्वपरीक्षा वगळता कोणतीच परीक्षा घेतली नाही

स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी चिंताग्रस्त !

पुणे – मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा वगळता एकही परीक्षा घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आम्ही स्वप्निल लोणकर सारखा आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा का ?, असा प्रश्न विद्यार्थी वर्गाने उपस्थित केला आहे. (स्वप्निल लोणकर या स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने पदभरती न झाल्याने आत्महत्या केली होती.) गेल्या दोन वर्षांत ६ वेळा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविषयी प्रशासन काय कारवाई करणार आहे ? विद्यार्थी आत्महत्या करत आहे, तर ही गंभीर गोष्ट आहे, हे प्रशासनाला लक्षात येत नाही का ? – संपादक) कोरोनाने आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. नवीन व्यवसाय करायचा, तर कोरोनाची लाट येते तर कधी दळणवळण बंदी जाहीर होते. राज्य सरकारचे नोकर कपातीचे धोरण, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती, नोकर भरतीतील अपारदर्शकता अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थीवर्ग सैरभैर झाला आहे. यावर राज्यशासन आणि लोकसेवा आयोगाने मिळून उपाय काढावा, अशी विनंती विद्यार्थी वर्गाने केली आहे. संकटे असली तरी त्यावर आत्महत्या करणे हा उपाय नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत ते शोधून आपण पुढे गेले पाहिजे, असे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. राज बिक्कड यांनी व्यक्त केले.