परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आणि सनातन प्रभात समूह !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी २९ मे २०१६ पासून १८ मे २०१७ पर्यंतचा कालावधी सनातन परिवारात अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आनंदाने साजरा होत आहे. सनातन प्रभात नियतकालिकांची निर्मिती ही परात्पर गुरु आठवले यांची कल्पना होती. राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी उपयुक्त अशी त्यांची संकल्पना आम्ही उचलून धरली आणि १९९८ मध्ये साप्ताहिकाच्या रूपाने बाळसे धरलेल्या सनातन प्रभातने आज सनातन प्रभात नियतकालिक समूह असे व्यापक स्वरूप धारण केले आहे.

आज दैनिकाच्या ४ आवृत्त्या, मराठी आणि कन्नड भाषेतील साप्ताहिक, हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक आणि गुजराती मासिक, असा त्याचा व्याप झाला आहे. शेकडो साधक या सेवेत असून त्यातून आध्यात्मिक आनंद घेत आहेत अन् प्रगती करून घेत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे प्रसिद्धीमाध्यम क्षेत्र आहे. सनातनच्या आश्रमांतील विविध ठिकाणांची मांडणी पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसार कार्याची व्याप्ती लक्षात येते. वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती असा त्यांच्या कार्याचा उद्देश असून त्यासाठी त्यांचीच संकल्पशक्ती फलद्रूप होऊन सुविधा उपलब्ध होतात. साधकाने केवळ येऊन त्यांचा लाभ घ्यायचा असतो.

जिज्ञासूंनी येऊन उपलब्ध साधनांच्या साहाय्याने साधना करावी आणि स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी, असे करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत. आध्यात्मिक प्रगती आणि हिंदु राष्ट्राची अर्थात् सनातन धर्म राज्याच्या स्थापनेची आस या दोन ध्येयांनी प्रेरित असे त्यांचे कार्य चालू आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती अभियान अक्षय्य तृतीयेपासून कार्यान्वित झाले असून त्या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील साधक, हिंदुत्वनिष्ठ दिंडी काढणे, सभा घेणे, देवळात देवाला साकडे घालणे, असे कार्यक्रम करत आहेत. त्यांना मिळालेली ती उत्तम सेवा आहे. धर्मप्रसारासाठी अमृत महोत्सवाचा अशा पद्धतीने उपयोग करून घेण्यावर भर देण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी सनातनचे कार्य जगभर पसरवले आहे. जगभरातील विविध पंथांचे जिज्ञासू, ज्यांना धर्मच ठाऊक नाही, असे जिज्ञासू शिकण्यासाठी आणि प्रत्यक्ष साधना अनुभवण्यासाठी म्हणून येतात आणि त्यांच्यासाठी असलेली साधना करून स्वतःच्या जीवनाचे सार्थक करून घेत आहेत. त्यांना त्यांच्या समस्यांचे उत्तर मिळते, तोडगा सापडतो आणि जीवनाचे रहस्य लक्षात येते. ते त्यांचे अनुभव कथन करतात. कोणी म्हणतो, माझी व्यसनाधीनता गेली, कोणी म्हणतो, मला शांत झोप लागायला लागली, तर कोणी म्हणतो, मला वाटत असलेले भय निघून गेले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे जे संतमाहात्म्य आहे, त्याची प्रचीती देणारे संत म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले. हिंदु राष्ट्र म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्था. संघर्ष नाही, रागरुसवे नाहीत, चोर्‍या, खून, मारामार्‍या, बलात्कार, हिंसाचार नाही. केवळ परिस्थिती स्वीकारणे आणि प्रेमभाव यांच्या वातावरणातील जग निर्माण करण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यांच्या या कार्यामागील उदात्त हेतू पाहून जगभरातील लोक प्रभावित झाले आहेत आणि त्यांच्या कार्यात सहभागी होऊन गोप-गोपींप्रमाणे छोट्या काठ्यांचा आधार देण्याची भूमिका त्यांना निभवावीशी वाटते.

हिंदु राष्ट्र स्थापनेचा ध्यास !

हिंदु राष्ट्र म्हणजे सत्त्वगुणी लोकांनी सत्त्वगुणी लोकांसाठी चालवलेले सत्त्वगुणी लोकांचे राज्य ! जगात रज-तम प्रधान लोकसंख्या अधिक असून सत्त्वगुणी जनतेवर त्याचे आधिक्य रहाते. हे आधिक्य न्यून करण्यासाठी रज-तम प्रधान जनता सत्त्वगुणी बनली पाहिजे. त्यासाठी आवश्यक साधना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितली आहे. जनता सत्त्वगुणी कशी बनेल ? त्यासाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रात मोठे पालट होणे आवश्यक आहे. साधना करून म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात राहून कर्तव्य बजावत गेलो की, हे साध्य होणार आहे. देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. स्वातंत्र्यापासून वर्ष २०१४ पर्यंत जे भोगले आणि अनुभवले, त्यातून बाहेर पडण्याची मानसिकता भारतियांमध्ये नव्हती. सहिष्णुतेचा म्हणजेच सहनशीलतेचा प्रभाव अधिक असल्याने हे झाले. हे असेच चालू राहिले, तर भारतीय संस्कृती आणि हिंदु जनता यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होऊ लागली. दैवी योगायोग म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. त्या राज्यातील अराजकतेवर त्यांनी प्रथम बोट ठेवले. महिलांना रस्त्यावरून चालत जाणे अशक्यप्राय होऊन बसले होते. कुठे अंगभर दागिने घालून एखादी महिला मध्यरात्री निर्भयपणे वावरू शकेल, असे ते रामराज्य आणि कुठे महिलांना छळणारी व्यवस्था असलेले उत्तरप्रदेश राज्य ! योगी आदित्यनाथ राज्यातील अराजकतेच्या मुळाशी गेले आणि सडकसख्यांच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली. लवकरच उत्तरप्रदेश राज्याला देशातील आदर्श राज्य ही उपाधी मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. त्यांची कार्यशैली पहाता, ते ही किमया करून दाखवू शकतात. राज्याचा मुख्यमंत्री योगी असल्यावर राज्य आदर्श का होणार नाही ? स्वच्छ हिंदु विचारधारा असलेल्या विभूतीच समष्टीचे कल्याण चिंतू शकतात.

समारोपाचे दोन शब्द !

हिंदु राष्ट्र का हवे ? हा प्रश्‍न देशभर ठिकठिकाणी विचारला जात आहे. प्रामाणिक राज्यकारभाराची ग्वाही देणारी ही हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना आहे. त्यात ईश्‍वरी अधिष्ठान आहे. अधर्माच्या गोष्टी निपटून काढण्याची शक्ती त्यात आहे. महिलांना जीवन सुसह्य करण्याची तरतूद त्यात आहे. त्यात फसवेगिरी नाही. करता-करविता देव आहे, प्रामाणिकपणे क्रियमाण करत रहाणे, हेच आपले कर्तव्य असते. विद्यमान व्यवस्थेत काय आहे ? खून, मारामार्‍या, बलात्कार आणि हिंसाचार ! समाजकंटकांना अपराध करतांना कुणाची भीती वाटत नाही कि पोलिसाच्या थोबाडीत मारतांना काही वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांना अभिप्रेत असलेल्या साधकामध्ये स्वतःला रूपांतरित करण्याचा निश्‍चय सनातनच्या सर्वच साधकांनी अगोदरच केला आहे. हा साधकवर्ग गुरुदेवांच्या कार्याशी समरस झालेला आहे, हे आम्ही मनात कोणताही संदेह न बाळगता सांगत आहोत. हिंदु राष्ट्र स्थापना ही काळाची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आणि निर्भय जीवन ही त्याची परिणती असल्याने या संकल्पनेला पाठिंबा देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !