गौरवशाली स्त्रियांचा आदर्श ठेवून योग्य दिशा दिल्यास मुली आत्महत्येपासून स्वत:ला वाचवू शकतील ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

तासगाव (जिल्हा सांगली) येथील ‘पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय’ येथे विद्यार्थिनींसाठी चार दिवसांची विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला 

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या महिला वक्त्यांचा सहभाग !

सौ. राजश्री तिवारी

तासगाव (जिल्हा सांगली) – स्त्री हे केवळ मातृशक्तीचे प्रतीक नसून ती धैर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. याची साक्ष देणार्‍या गार्गी, मैत्रेयी, कैकयी, सीता, भारतीदेवी, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता या कुटुंबवत्सल तर होत्याच; पण त्यांच्यात युद्धकौशल्य आणि राज्यकारभार चालवण्याचे ज्ञानही होते. आजच्या विद्यार्थिनींनी अशा स्त्रियांचे चरित्र अभ्यासण्याचे आणि त्यांच्यातील गुण स्वत:मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भारतातील या गौरवशाली स्त्रियांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनास दिशा दिल्यास मुली आत्महत्येपासून स्वत:ला वाचवू शकतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. येथील ‘पी.डी.व्ही.पी. महाविद्यालया’मध्ये ‘महिला सक्षमीकरण आणि अंतर्गत मूल्यमापन विभागा’च्या वतीने महिलांसाठी ३ दिवसांच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘भारतीय स्त्रियांचा गौरवशाली इतिहास’ या विषयावर सौ. तिवारी बोलत होत्या. या ३ दिवसांच्या ऑनलाईन व्याख्यानामध्ये समितीच्या कु. प्रतिभा तावरे आणि श्रीमती मधुरा तोफखाने यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

​महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आयोजन महिला सक्षमीकरण प्रमुख अन् अंतर्गत मूल्यमापन प्रमुख डॉ. (सौ.) अलका ईनामदार यांनी केले. या ३ दिवसांच्या व्याख्यानाचा लाभ ५० विद्यार्थिनींनी घेतला. ही व्याख्याने ऐकून ‘आम्हाला चांगली माहिती मिळाली’, असे अभिप्राय विद्यार्थिनींनी व्यक्त केले.

ताणाच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मनोनियंत्रण कसे करायचे हे प्रत्येकाने शिकून घेणे आवश्यक ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाच्या मनावर ताण आहे. अनेक विद्यार्थी आज परीक्षा होईल का ? आपले पुढे कसे होणार ? या तणावपूर्ण वातावरणातून जात आहेत. तणावाचे प्रमाण वाढले की, आपले मानसिक संतुलन बिघडणे, शारीरिक दुर्बलता निर्माण होणे, असे दुष्परिणाम दिसू लागतात. यामुळे आपली कार्यक्षमता अल्प होते आणि आपण हतबल होतो. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मनोनियंत्रण कसे करायचे हे प्रत्येकाने शिकून घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. हे मार्गदर्शन त्यांनी ‘व्यक्तीमत्व विकास’ याविषयावर बोलतांना केले.
सौ. तिवारी पुढे म्हणाल्या, ‘‘स्वतःतील दोष कोणते आहेत ? दोष निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दोषांची सूची करून तीव्र दोषांवर सकारात्मक सूचना सिद्ध करणे आणि या सूचना दिवसात ५ वेळा म्हणणे, अशा कृती कराव्या लागतील. यामुळे मनावरील अयोग्य संस्कार हळूहळू पुसले जाऊन मनाची सकारात्मकता वाढते आणि आपले मनोबल वाढते. यातून आपण प्रतिकूल परिस्थितीवर या मनोबलाने मात करू शकतो.’’

दुष्प्रवृत्तींच्या विरोधात महिलांनी त्यांच्यातील शौर्य जागृत करणे हाच उपाय ! – कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

कु. प्रतिभा तावरे

‘शौर्यजागृती’ या विषयावर मार्गदर्शन करतांना समितीच्या कु. प्रतिभा तावरे म्हणाल्या की, सद्यःस्थितीचा विचार करता आपल्या मुली उच्चशिक्षित होत आहेत; परंतु त्या सुरक्षित आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. महिला अत्याचारावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद आपल्या न्यायव्यवस्थेत नसल्याने समाजात स्त्रीकडे वाईट नजरेने पहाण्याची दुष्प्रवृत्ती दिवसेंदिवस बोकाळत आहे. यावर महिलांनी त्यांच्यातील शौर्य जागृत करणे, हाच उपाय आहे. स्वरक्षणासाठी महिलांनी किमान लाठीकाठी, कराटे आदींचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीसह काही स्वयंसेवी संस्था स्वरक्षणाचे प्रशिक्षण विनामूल्य देत आहेत. त्यामध्ये सर्व मुलींनी सहभागी व्हावे.

आजच्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणे आवश्यक ! – श्रीमती मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

श्रीमती मधुरा तोफखाने

‘भारतीय संस्कृतीत अलंकार आणि वेशभूषा यांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने म्हणाल्या की, आज सर्व जग भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अलंकार हे केवळ सौंदर्य वाढावे म्हणून परिधान केले जात नाहीत, तर वेगवेगळ्या अवयवांवर अलंकार परिधान केल्याने स्त्रियांच्या त्या त्या अवयवांवर बिंदूदाबन होऊन त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे मनाचा उत्साह वाढतो आणि शारीरिक व्याधी दूर होतात. आज सर्वांवर पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आपण पुन्हा भारतीय संस्कृती आणि तिची महानता यांचा अभ्यास केला पाहिजे.