साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘मानवी जीवन क्षणभंगूर आहे, तसेच सध्याचे वातावरण पुष्कळ असुरक्षितही झाले आहे. बहुतांश प्रशासकीय यंत्रणा अकार्यक्षम असून संभाव्य आपत्काळ अगदी समीप येऊन ठेपला आहे. या सर्व घटकांचा विचार करता ‘आपण संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती (स्थावर आणि चल (धन, शेअर्स, सोने, चांदी आदी संपत्ती) मिळवली, तिचा उपभोग आपल्या पश्चात ‘कुणी आणि कसा घ्यावा ?’ याविषयीचा निर्णय आपण इच्छापत्राद्वारे (मृत्यूपत्राद्वारे) स्वतःच स्पष्ट केल्यास ‘त्या मालमत्तेचे पुढे काय होईल ?’ याची काळजी आपल्याला उरत नाही.
१. इच्छापत्र सिद्ध करून ठेवल्याने होणारे लाभ
अ. आपल्या मालमत्तेवरून नातेवाइकांत होणारे वादविवाद आणि त्यामुळे होणारे त्रास टाळता येतात.
आ. ‘स्वकष्टार्जित मिळकत योग्य व्यक्तीच्या हाती जाईल’, याचे समाधान लाभते.
इ. आपले वारस असल्यास अथवा नसल्यास ‘काही कारणाने ज्यांच्याशी सर्व संबंध तोडलेले आहेत’, असे नातेवाइकही मृत्यूनंतर संपत्ती हडप करण्याचा धोका इच्छापत्र करून ठेवल्याने टाळता येतो.
ई. इच्छापत्र केले नसेल, तर कुमार्गाला लागलेले एखादे अपत्य अथवा नातेवाईक आपल्या मृत्यूनंतर संपत्तीत वाटा मागू शकेल आणि त्यासाठी कोर्टकचेरीचा नाहक त्रास अन् अनावश्यक व्यय आपल्या आप्तेष्टांना सोसावा लागतो.
उ. कुणी सख्खे नातेवाईक नसल्यास ‘आपल्या पश्चात आपली मिळकत कुणाला द्यायची ?’, याचा निर्णय मृत्यूपत्राद्वारे आपण स्पष्ट करू शकतो.
ऊ. मृत्यूपत्र करून इतरांना आपल्या संपत्तीतील वाटा दिल्यास त्यांना दिलेल्या संपत्तीवरील आपला आयकर (‘इन्कम टॅक्स’) अल्प होतो.
ए. अनेकांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याकरता धनरूपात साहाय्य करण्याची इच्छा असते. ते इच्छापत्राद्वारे आपल्या संपत्तीतील काही वाटा अशा कार्यासाठी देणगी रूपात देऊ शकतात. असे केल्याने राष्ट्र आणि धर्म कार्यात आपला हातभार लागतो.
२. मृत्यूपत्र विधीसंमत होण्यासाठी काय करावे ?
अ. मृत्यूपत्र लिखित स्वरूपात (हस्तलिखित अथवा टंकलिखित) असावे.
आ. मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, तसेच दोन साक्षीदारांनी मृत्यूपत्रावर त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षर्या केलेल्या असाव्यात.
इ. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती वयस्कर असल्यास शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मृत्यूपत्र करण्यास सक्षम असल्याचा वैद्यकीय दाखला असणे आवश्यक आहे.
ई. ‘उपनिबंधक कार्यालया’त (‘रजिस्ट्रार ऑफिस’मध्ये) मृत्यूपत्राची नोंदणी केल्यामुळे मृत्यूपत्राच्या सत्यतेविषयी निश्चिंत रहाता येते. (गोवा राज्यात मृत्यूपत्राची नोंदणी अनिवार्य आहे.)
३. मृत्यूपत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे
अ. मृत्यूपत्राची मूळ प्रत सुरक्षिततेसाठी उपनिबंधक कार्यालयात जमा (legal custody) करता येते.
आ. आपल्याला सुरक्षित आणि विश्वास असणार्या व्यक्तीकडे मृत्यूपत्र ठेवता येते.
४. आपल्या हयातीत मृत्यूपत्रामध्ये आवश्यकतेप्रमाणे पालट करता येतात.
वरील सूत्रे लक्षात घेऊन सर्वांनी स्वतःचे मृत्यूपत्र लवकरात लवकर सिद्ध करावे.’
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद (२६.६.२०२१)
आपल्या हयातीत मृत्यूपत्र बनवून त्या धनाचा विनियोग ‘सत्पात्रे दान’ म्हणून होण्यासाठी प्रयत्न करा !साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !‘आपण आयुष्यभर कष्ट करून कमावलेले धन आपल्या मृत्यूनंतर ‘योग्य व्यक्तीच्या हातात, तसेच योग्य ठिकाणी वापरले जाऊन ते ‘सत्पात्रे दान’ व्हायला हवे’, अशी इच्छा प्रत्येकालाच असते. आपले धन अयोग्य व्यक्तीच्या हातात पडले आणि तिने त्याचा अयोग्य गोष्टींसाठी वापर केला, तर धर्मशास्त्रानुसार त्यातून देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो आणि तो फेडावाही लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हयातीत मृत्यूपत्र करून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे या धनाचा विनियोग योग्य व्यक्ती, संतांचे कार्य, तसेच सत्चे कार्य (राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य) यांसाठी करता येईल. असे करणे ही एक प्रकारे राष्ट्र आणि धर्म यांची सेवाच आहे. त्यामुळे ‘सत्पात्रे दान’ होऊन त्याचा लाभही होईल. ‘मृत्यूपत्र केले म्हणजे मृत्यू येतो’, असा अपसमज समाजात दिसून येत असला, तरी आपल्या हयातीत आपण आपले मृत्यूपत्र सिद्ध करून ठेवल्यास आपल्या पश्चात आपल्या मिळकतीचे योग्य व्यवस्थापन स्वतः केल्याने आपण निश्चिंत होतो. आपत्काळ चालू झाला असल्याने सर्वांनी स्वतःचे मृत्यूपत्र लवकरात लवकर सिद्ध करावे, तसेच ते करण्याविषयी एकमेकांना आठवणही करून द्यावी.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२१) |
मृत्यूपत्राच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती सुरक्षित ठिकाणी ठेवा !मृत्यूपत्राच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती काढून ठेवल्या आणि त्या अयोग्य व्यक्तीच्या हाती लागल्या, तर त्यातील लिखाणामुळे आपापसांत वितुष्ट निर्माण होऊ शकते. त्यामुळे छायांकित प्रती काढल्यास त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. |