आरोसबाग येथे तेरेखोल नदीवरील पूल भूमीपूजनानंतर तब्बल २२ वर्षांनंतर पूर्ण !

उद्घाटनाच्या वेळी ग्रामस्थांनी फटाके फोडून मिठाई वाटली !

  • ही आहे प्रशासनाची (अ)कार्यक्षमता !
  • पुलाचे काम पूर्ण व्हायला २२ वर्षे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
पुलाचे काम तब्बल २२ वर्षांनी पूर्ण झाले

सावंतवाडी – शेर्ले, आरोसबाग येथे तेरेखोल नदीवरील पुलाचे काम तब्बल २२ वर्षांनी पूर्ण झाले असून ग्रामस्थांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले. या पुलामुळे नदीतून केल्या जाणार्‍या होडीच्या जीवघेण्या प्रवासाला पूर्ण विराम मिळणार आहे.

तालुक्यातील शेर्ले गावची आरोसबाग वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. दळणवळणासाठी होडी हाच एकमेव पर्याय होता. गेली अनेक वर्षे ग्रामस्थांचा होडीतून जीवघेणा प्रवास चालू होता. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २३ मे १९९९ या दिवशी या पुलाचे भूमीपूजन झाले होते; मात्र शिवसेना-भाजप यांचे युती शासन गेल्यानंतर काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्‍न रखडला. पुन्हा युती सरकार आल्यानंतर कामास २ वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. (विकासकामांमध्येही राजकारण केले जाते, हे यावरून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? एका पक्षाच्या सरकारने संमत केलेले काम दुसर्‍या पक्षाचे सरकार आल्यावर रखडते, याला काय म्हणावे ! – संपादक) यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण करण्यात आले.

पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आरोसबाग वाडीतील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि मिठाई वाटली.