लोक लसीकरणासाठी बाहेर पडण्याची वाट न पहाता घराघरांत जाऊन लसीकरण करायला हवे ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – आजच्या क्षणाला कोरोना हा आपल्या घरात घुसलेला शत्रू आहे. त्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला पाहिजे. लोक लसीकरणासाठी बाहेर कधी पडतील ? याची वाट न पहाता घराघरांत जाऊन लसीकरण करायला हवे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दक्षिणेतील काही राज्यांत हे होऊ शकते, उत्तर-पूर्वेत होऊ शकते, मग पश्‍चिमेकडील राज्यात का नाही ? असा प्रश्‍नही या वेळी न्यायालयाने विचारला.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेर जाणे शक्य नसल्यामुळे त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाद्वारे केली होती. यावर ८ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील निर्देश दिले.

न्यायालयाने म्हटले की, मुंबईतही काही मोठ्या राजकीय नेत्यांना घरात जाऊन लस देण्यात आली. ती कुणी दिली ? महापालिकेने कि राज्य सरकारने ? याचे दायित्व कुणीतरी घ्यायलाच हवे. आम्ही अनुमती देत असतांनाही महानगरपालिकेने केंद्र सरकारकडे बोट दाखवून आमची निराशा केली. वेळीच लस मिळाली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते. घरांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक अंथरुणाला खिळून आहेत, त्यांचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करा. याविषयी सरकारने गांभीर्याने विचार करून ११ जून या दिवशी होणार्‍या सुनावणीच्या वेळी याविषयीची भूमिका स्पष्ट करावी.’’