राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त यांवर कार्यकर्त्यांचे आरोप !

पुणे – राष्ट्र सेवा दलाला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे; मात्र सध्या तेथे गोंधळाचे वातावरण आहे. सेवा दलाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघटनेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार पाटील यांनी संघटनेच्या नियमांचा अपवापर करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनेचे पद देऊन कब्जा मिळवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या अनेक प्रकल्प आणि मालमत्ता यांचे हस्तांतरण तसेच स्थलांतरण चालू असून तिथे अनावश्यक मोठा व्यय केला जात आहे. अनेक गोष्टींमध्ये अपव्यवहार होत आहेत. त्यामुळे आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी साने गुरुजी स्मारक येथे ४ कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण चालू केलं आहे.

कपिल पाटील लोकभारती या राजकीय पक्षाचे प्रमुख असतांनाही ते संघटनेच्या कार्यकारी विश्वस्तपदी आहेत. सेवा दलाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षात जाऊन पद घेण्याची मुभा नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.