महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नावे आलेल्या बोगस नियुक्तीपत्रांना बळी पडू नका ! – दीपक माने, प्रादेशिक अधिकारी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एम्.टी.डी.सी.चे) बोगस ‘लेटर हेड’ आणि शिक्के यांचा वापर करून कोणी अज्ञात व्यक्ती काही उमेदवारांना नोकरीविषयीचे नियुक्ती पत्र देत असल्याचे दिसून आले आहे. अशा नियुक्तीपत्रांना बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (‘एम्.टी.डी.सी.’च्या) कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी केले आहे.

माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोकण विभागाद्वारे कोणत्याही पद्धतीचे नोकर भरतीविषयीचे विज्ञापन प्रसिद्ध केलेले नाही आणि कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती कोकण विभागाकडून केलेली नाही. अज्ञात व्यक्तींद्वारे गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशी बोगस नियुक्तीपत्रे किंवा विज्ञापने यांना बळी पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल, त्यांनी संबंधितांच्या विरोधात तक्रार नोंद करावी. याविषयी आवश्यक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, एम्.टी.डी.सी., कोकण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, ‘ए’ विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.