अधिवेशनात सहभागी झालेल्या अधिवक्त्यांचे मनोगत !

स्वत: आतून आनंदी राहून अडचणी सोडवता येतात’, हे शिकलो ! – अधिवक्ता प्रतीक मिश्र, लखनऊ

अधिवक्ता अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे मला ‘इथे कार्य केल्यानंतर आत्मशांती मिळेल’, याची निश्‍चिती वाटते. लहानपणापासून मला समाजात घडणार्‍या चुकीच्या गोष्टींविषयी राग येत असे; पण माझ्याकडून कृती होत नव्हती. आश्रमातील अधिवेशनात सहभागी झाल्यावर ‘स्वत: आतून आनंदी राहूनही अडचणी सोडवता येतात’, हे शिकायला मिळाले.

असे अधिवेशन आतापर्यंत शासनालाही आयोजित करता आले नाही ! – श्री. अण्णामलई, तमिळनाडू

असे अधिवेशन आजपर्यंत शासनालाही आयोजित करता आले नव्हते. विविध राज्यांतील, वेगळी भाषा, आचार-विचार असणार्‍या आणि उच्चशिक्षित अधिवक्त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या एका ध्येयाने एकत्र आणणे आजपर्यंत कुणालाच जमले नव्हते. साधनेच्या आधारावर आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनातून ‘मी प्रथम भारतीय, मग हिंदु, मग तमिळी किंवा अन्य कुणी’, या विचाराने सर्वजण एकत्रित आले.

हिंदु राष्ट्रासाठी लढा देण्याची संधी मिळाली ! – अधिवक्ता शरतचंद्र मुंदरगी, कर्नाटक

माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. मी विद्यार्थी असतांना भारताचा एक स्वातंत्र्यलढा पाहिला होता. आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा देण्याची संधी मिळाली.

न्यायालयीन सेवेतून साधना होणार, हे लक्षात आले ! – अधिवक्त्या (कु.) दिव्या बाळेहित्तल

प्रारंभी या क्षेत्रात उत्साह वाटत होता; मात्र हे क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने ते सोडून केवळ साधनाच करायचे ठरवले. दाव्यांच्या तारखांना उपस्थित रहाणे, ही सेवा समजून करू लागल्यावर ‘त्यातूनच माझी साधना होणार आहे’, हे लक्षात आले. याचिका बनवतांना टंकलेखनातील चुका टाळणे, प्रती काढतांना कागदाचा काटकसरीने वापर करणे, या गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रवासात अधिवक्त्यांच्या भेटी होणे, ते हिंदुत्वाच्या कार्याशी जोडले जाणे आदी अनुभूतीही आल्या. अधिवक्त्यांना मिळालेल्या या सुविधांचा हिंदुत्वाच्या कार्यासाठी अधिकाधिक उपयोग करायला हवा.