रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील अधिवक्ता अधिवेशनाची भावपूर्ण वातावरणात सांगता !

भारतभरातील अधिवक्त्यांमध्ये निर्माण झाली एकजूट आणि कुटुंबभावना !

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ९ ते १२ मे या कालावधीत अधिवक्ता अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला भारतभरातील अधिवक्ते, निवृत्त न्यायाधीश, हिंदुत्वनिष्ठ आदी उपस्थित होते. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ता भारतातील विविध राज्यांतून आलेले, वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती असणारे अन् प्रथमच एकमेकांना भेटले होते, तरी केवळ चार दिवसांत त्यांच्यात आध्यात्मिक स्तरावर निर्माण झालेली कुटुंबभावना ही हिंदु राष्ट्राची नांदीच !

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी अधिवक्ता सर्वांत पुढे !
समाजकार्य असो वा
राष्ट्र-धर्म हानीच्या घटना रोखणे ।
हिंदु विधीज्ञ परिषद असे सर्वांत पुढे ॥ १ ॥
साधक अधिवक्ता घडण्यासाठी ।
अधिवक्ता अधिवेशन आश्रमात घडे ॥ २ ॥
स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन
प्रक्रिया जाणूनी घेऊन ।
स्वत:त आणि न्याय प्रक्रियेत ती राबवून ॥ ३ ॥
सर्वांत पुढे असती अधिवक्ता ।
करण्यास आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन ॥ ४ ॥

– कु. ऋतुजा शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी.

हिंदु राष्ट्रात (रामराज्यात) कायदे, पोलीस आणि न्यायाधीश यांची आवश्यकता नसणार !

‘मानवी जीवनात हल्ली कायदे, पोलीस आणि न्यायाधीश यांना बरेच महत्त्व आले आहे. याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे साधना न केल्याने रज-तम प्रधान झालेला हल्लीचा मानव ! सर्वांकडून साधना करवून घेऊन समाज रामराज्यातील प्रजेसारखा सात्त्विक केला की, कायदे, पोलीस आणि न्यायाधीश यांची आवश्यकताच भासणार नाही ! या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अधिवक्ता अधिवेशनाच्या सांगता समारंभातील मान्यवरांचे मार्गदर्शन !

कर्तव्य समजून हिंदुत्वासाठी न्यायालयीन लढा देऊया ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

एखादा योद्धा जेव्हा युद्धात जखमी होतो, तेव्हा तो सर्व ताकदीनिशी लढतो, त्याप्रमाणे हिंदु धर्माला झालेल्या जखमा स्वत:च्या मानून सर्वशक्तीनिशी न्यायालयीन लढा देऊया. या लढ्यात संत हे आपले सेनापती आहेत. व्यवहारिक जीवन असो वा हिंदुत्वाचे कार्य, प्रत्येकाला काही प्रमाणात निराशा येते; मात्र त्या वेळी देवावर श्रद्धा ठेवून कार्य करायचे. ‘कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नको. दु:ख विसरून माझ्यावर श्रद्धा ठेव. मी तुला मोक्ष मिळवून देणारच आहे’, हे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले आहे. आपण या कार्याशी जोडले गेलो आहोत, यासाठी आपण स्वत:ला भाग्यवान समजले पाहिजे.

भारतभरातील अधिवक्त्यांची एकजूट, ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याची फलनिष्पत्ती ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

भारतभरातून आलेल्या अधिवक्त्यांची एकजूट हीच हिंदु विधीज्ञ परिषदेच्या आतापर्यंतच्या कार्याची फलनिष्पत्ती आहे. जेथे जाऊ तेथे देव उपस्थितच आहे. अधिवक्त्यांनी केवळ राष्ट्र आणि धर्म यांची हानी होणार्‍या घटनांच्या विरोधात न्यायालयीन लढ्याला आरंभ करायचा आहे. पुढील वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य दहा पटींनी वाढलेले असेल अशी आशा करूया. हिंदु विधिज्ञ परिषदेच्या यशामागे काही अधिवक्त्यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत असे नसून ती केवळ ईश्‍वरी कृपाच आहे. धर्माच्या झेंड्याखाली जो अधिवक्ता उभा राहील तो यशस्वी होणारच आहे.

…असा दाटला मनी भाव ! पाणावले नयन ! झरे वाहिले कृतज्ञतेचे !

१. दु:खी किंवा निराश झाल्यावर भगवान श्रीकृष्णाचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येऊन कार्य करण्यासाठी पुन्हा उभारी येणे !

प्रारंभी सनातन संस्थेच्या कार्याशी जोडला गेलो, तेव्हा ‘व्यवहाराप्रमाणे इथेही पुष्कळ स्पर्धा असणार’, असे वाटले होते; मात्र प्रत्यक्ष कार्य करू लागल्यावर इथे स्पर्धा नाही, येथे केवळ राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वत:चे अस्तित्व विसरून निस्वार्थीपणे सेवा करणारे साधक पाहिले. सेवा करतांना अधिवक्ता रामदास केसरकर नामजपाची आठवण करून देत. हिंदुत्वनिष्ठ किंवा साधकांचा छळ होतांना पाहिले की, दु:ख होते, निराशा येते; पण तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि कार्य करण्यासाठी पुन्हा उभारी येते. आणखी बरेच काही करायचे आहे, याची जाणीव होऊन पुन्हा कार्याला आरंभ करतो.

– अधिवक्ता संजीव पुनाळेकर

२. एक कुटुंबभावना निर्माण होणे आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या मार्गावर आपण पुन्हा भेटूया !’, असे म्हणताच आध्यात्मिक स्तरावर जोडले गेलेल्या अधिवक्त्यांचे डोळे पाणावणे !

अधिवक्ता अधिवेशनात झालेल्या गटचर्चांमध्ये भारतभरातून आलेल्या अधिवक्त्यांचा सहभाग पाहून हिंदु विधीज्ञ परिषद हे एक कुटुंब बनले असल्याचे तीव्रतेने वाटले. इस्रायल देशाच्या निर्मितीपूर्वी ज्यू लोक २ सहस्र वर्षे जगभरात विखुरलेले होते. त्यांची जेव्हा एकमेकांशी भेट होत असे, तेव्हा ते ‘पुढच्या वेळी इस्रायलमध्ये भेटू’, असे म्हणत असत. त्याचप्रमाणे अधिवेशनातून निरोप घेतांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या मार्गावर आपण पुन्हा भेटूया !’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हणताच केवळ चार दिवसांत एकमेकांशी आध्यात्मिक स्तरावर जोडले गेलेल्या सर्वच अधिवक्त्यांचे डोळे पाणावले.

श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना यश मिळण्यासाठी प्रयत्न करा ! – निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

रामनाथी, गोवा – काही न्यायाधिशांच्या मनात पूर्वी सनातन संस्था किंवा हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याविषयी अपसमज होता. प्रसिद्धीमाध्यमांनी पसरवलेला हिंदुद्वेष हेच त्यांच्या अपसमजाचे कारण होते. त्यामुळे पूर्वी हिंदुत्वनिष्ठांच्या दाव्यांमध्ये अधिवक्त्यांना यश मिळत नसे. आता तशी स्थिती नाही. याचा अभ्यास केल्यावर आणि काही अनुभवांवरून असे लक्षात आले की, अधिवक्त्याचे समाजातील व्यक्तींशी किंवा न्यायालयात येणार्‍या नागरिकांशी नम्रतेचे आणि चांगले वर्तन असेल, तर त्याचा अधिवक्त्याला लाभ होऊन दाव्यात यश मिळतेे. अधिवक्त्याच्या चांगल्या वागण्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनात पालट होतो. बर्‍याच जणांना सनातन संस्था चांगले कार्य करते, हे आता ठाऊक झाले आहे. अधिवक्त्यांच्या चांगल्या वागणुकीचा हा परिणाम आहे. त्यामुळे श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवून सनातन संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन संभाजीनगर, महाराष्ट्र येथील ज्येष्ठ निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांनी केले. निवृत्त न्यायाधीश चपळगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे अधिवेशनात सहभागी झालेले सर्वच अधिवक्ता भारावून गेले.