‘माझी आई, माझ्या बाई आणि माझे सर्वकाही’ असलेले सर्वसामान्यांतील असामान्य व्यक्तीमत्त्व प.पू. (सौ.) मंगला नरसिंह उपाध्ये !

वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी (१८ मे) या दिवशी पुणे येथील संत प.पू. (सौ.) मंगला नरसिंह उपाध्येे यांची तिथीनुसार तृतीय पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला नरसिंह उपाध्ये

१. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांची ‘जयंती’ आणि ‘पुण्यतिथी’ पाठोपाठ आल्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणे

‘सर्वत्र दळणवळण बंदी चालू असतांना आईच्या (प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या) आठवणीने मन विषण्ण होत असतांनाच तिच्या ‘जयंती’च्या दिवशी मागील आठवणींना उजाळा मिळाला आणि मन जरा सावरले गेले. १९ एप्रिल हा ‘महाराष्ट्र विद्यालया’च्या संस्थापिका, अनेक विद्यार्थ्यांच्या गुरु अन् आम्हा सर्व भावडांची आई उपाध्येबाई यांचा जन्मदिवस आहे आणि दुर्दैवाने २१ एप्रिल हा त्यांचा दिनांकानुसार स्मृतीदिन आहे !

१ अ. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईने शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रत्येक वर्षी पुरणपोळीचे जेवण देणे : योगायोगाने बाई (आई) शाळेत असतांना साधारण १९ एप्रिलपर्यंत शाळेच्या वार्षिक परीक्षा संपून सर्व शिक्षक एप्रिलच्या अखेरपर्यंत ‘उत्तरपत्रिका पडताळणे आणि निकालपत्र सिद्ध करणे’, यांत व्यस्त असत. ‘१९ एप्रिल’ या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आई आपले सर्व सहयोगी शिक्षक आणि कर्मचारी यांना पुरणपोळीचे जेवण देत असे. ती सेवानिवृत्त होईपर्यंत यात कधीही खंड पडला नाही. मी तिथेच लेखनिकेचे काम करत असल्याने तिच्या साहाय्याला असायचे. तेव्हा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यातील ऋणानुबंध अगदी घट्ट अन् दृढ होते. त्यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाला आवश्यक असे पोषक वातावरण आपोआपच सिद्ध होत असे. याचा मी अनुभव घेतला आहे.

२. शेवटपर्यंत आईच्या अंतरंगात शाळेविषयी पुष्कळ ममत्व असणे आणि तिला शाळेसाठी वडिलांचाही (प.पू. आबा उपाध्ये यांचाही) पुष्कळ सहयोग मिळालेला असणे

सौ. विद्या शेवडे

आईच्या बोलण्यात नेहमी ‘माझे सहयोगी शिक्षक (स्टाफ), माझे विद्यार्थी’, असा उल्लेख असायचा. निधनापूर्वीच्या तिच्या उतारवयातील काळातही ती ‘माझे विद्यार्थी माझी शाळा सांभाळतील’, असे म्हणायची. तिच्या अंतरंगात शाळेविषयी पुष्कळ ममत्व होते; कारण शाळा हे जणू तिचे दुसरे अपत्यच होते. शाळेविषयी असलेल्या तिच्या या ममत्वात आणि तळमळीत आमच्या आबांचा, म्हणजे कै. न.वा. उपाध्ये (प.पू. आबा उपाध्ये) यांचाही सहयोग होता. शाळेच्या बाबतीत ते अगदी सावलीसारखे तिच्यासमवेत होते. त्या दोघांमध्ये प्रचंड स्नेह होता.

३. आई रुग्णालयात अतीदक्षता विभागात असतांनाही सर्व मुलांनी तिचा वाढदिवस शाळेत ‘अल्पाहार आणि हळदीकुंकू’ देऊन, तर सहयोगी लोकांना बर्फी देऊन साजरा करणे

आई अतीदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर’वर होती. तेव्हा आम्ही सर्व भावंडे पुण्यातच होतो; मात्र ‘१९ एप्रिल’ या तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी मुंबईत शाळेत उपस्थित राहिले होते. केवळ ‘तिला बरे वाटावे’, यासाठी त्या दिवशी शाळेत तिचा वाढदिवस साजरा करतांना मी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘अल्पाहार आणि हळदीकुंकू’ असा छोटासा कार्यक्रम केला होता. बाकीच्या भावंडांनी रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि आधुनिक वैद्य यांना बर्फी देऊन तिचा वाढदिवस साजरा केला. ‘अत्यंत दुःखद वातावरणातही केवळ तिच्या कार्याचा सन्मान व्हावा’, या उदात्त हेतूने आम्ही हे केले होते. नंतर २१.४.२०१८ या दिवशी आईचे निधन झाले.

आईच्या आठवणींचे एक पुस्तकच होईल, एवढ्या तिच्या आठवणी आहेत. तिच्या अनेक आठवणींनी आम्हा सर्वांच्याच मनात घर केले आहे.’

– सौ. विद्या शेवडे (प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांची मुलगी), मुंबई (१९.४.२०२०)


प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांना सनातन संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभल्याने त्यांच्या मुलींनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

१. सनातनच्या आश्रमात आल्यावर माहेरी आल्याप्रमाणे जाणवणे

‘आम्ही बहिणी भाग्यवान आहोत’, असे आज मनोमन जाणवले; कारण आज आमचा सनातनच्या आश्रमात येण्याचा योग आला. आम्ही येथे ‘माहेरी आलो आहोत’, असे जाणवले.

२. प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांना अनेक साधकांचे प्रेम लाभणे अन् साधकांच्या गोड वाणीने ते भारावून जाणे

‘सनातन संस्थेने आमच्या आई-वडिलांना फार मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांना अनेक साधकांचे प्रेम लाभले’, हे आम्ही बहिणी कधीच विसरणार नाही. आम्ही त्यांना मिळालेली ‘सनातन’ची सेवा अनुभवली आहे. प.पू. आबा जुलै २०१९ मध्ये रामनाथी, गोवा येथील आश्रमात आले होते. त्या वेळी ते आपणा सर्वांकडून भरभरून प्रेम घेऊन आले आणि आपल्या सर्वांच्या गोड वाणीने भारावून गेले.

३. सनातनच्या साधकांनी आई-बाबांना फुलाप्रमाणे जपले असल्यामुळे सनातनचा आधार वाटणे

प.पू. आबा संगीतातील दर्दी होते आणि प.पू. आई शिक्षणप्रेमी होती. ती गोरेगाव, मुंबई येथील प्रथितयश शाळेची संस्थापिका होती. तिने अत्यंत खडतर तपश्‍चर्या करून शिक्षणाचे शिवधनुष्य पेलले. त्यामध्ये प.पू. आबांचाही सिंहाचा वाटा आहे. वय झाले असूनही आई-बाबा शाळेच्या बैठकीसाठी पुणे-मुंबई असा प्रवास करत असत. त्या वेळी त्यांना नेण्या-आणण्यासाठी सनातनचे साधक चारचाकी घेऊन यायचे. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रवासाविषयी निश्‍चिंत असायचो. आम्हाला कधीच त्यांची काळजी वाटली नाही. सनातनच्या साधकांनी आई-बाबांना फुलाप्रमाणे जपले. त्यामुळे आम्हा भावंडांना सनातनचा आधार वाटला.

४. गुरुदेवांचे आई-बाबांवर जातीने लक्ष असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आई-बाबांकडे जातीने लक्ष देत होते, तसेच ते पुण्यातील सर्व साधकांकडून आई-बाबांची सतत विचारपूस करत असत.

५. साधकांच्या सहकार्यामुळे वडिलांचे म्हातारपण क्लेशकारक न होता ते आनंदी असणे

आमचे दुःख मोठे आहे, तरीही दुःखात सुख असे आहे की, वडिलांचे वय अधिक असूनही त्यांचे म्हातारपण आपल्या सहकार्याने आणि आम्हा भावंडांच्या आधारामुळे क्लेशकारक झाले नाही. ते आनंदी होते. त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य मोठे होते; म्हणूनच आम्ही भावंडे भाग्यवान आहोत; कारण आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे.

आपणा सर्वांनाच मनोमन सदिच्छा देऊन आणि पुन्हा एकदा प्रणाम करून मी माझे चार शब्द संपवते.’

– सौ. विद्या शेवडे, अंधेरी, मुंबई; सौ. राजश्री श्री. फणसळकर आणि श्रीमती संध्या कोठावळे

(प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या कन्या) (२३.२.२०२०)