अखंड शिष्यभावात रहाणारे, तसेच भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे पिंगुळी, कुडाळ येथील थोर संत प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील थोर संत प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी १६ मे २०२१ या दिवशी देहत्याग केला. अध्यात्मातील त्यांचा अधिकार मोठा; मात्र ते शेवटपर्यंत स्वतःला ‘मी प.पू. राऊळ महाराजांचा शिष्य’ अशीच स्वतःची ओळख सांगत. यातून त्यांचा गुरुंप्रती असलेला अत्युच्च भाव आणि शिष्यभाव दिसून येतोे. प.पू. राऊळ महाराज यांच्यात विविध दैवी गुणांचा समुच्चय होता. भक्तांना भरभरून प्रेम देणारे आणि त्यांच्यावर मायेची पखरण करणारे प.पू. अण्णा महाराज यांचा सामाजिक कार्यातही हातभार होता. प.पू. राऊळ महाराज आणि सनातन संस्था यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी सनातनच्या साधकांवर नेहमीच प्रीतीचा वर्षाव केला आणि कार्याला भरभरून आशीर्वादही दिले. त्यांची विविध गुणवैशिष्ट्ये आपण पाहूया.

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज

 १. आदर्श शिष्य असणारे प.पू. अण्णा महाराज !

१ अ. गुरु आज्ञापालन हेच गुरुसेवेचे वैशिष्ट्य असणारे प.पू. अण्णा महाराज ! : वयाच्या १४ व्या वर्षापासून म्हणजे वर्ष १९६० पासून प.पू. अण्णा महाराजांनी स्वत:ला गुरुसेवेसाठी आणि जनसेवेसाठी झोकून दिले. वर्ष १९६० ते १९८४ ही दोन तपे प.पू. अण्णा महाराजांनी त्यांच्या गुरूंची म्हणजे प.पू. राऊळबाबांची सगुण रूपात सेवा केली. गुर्वाज्ञा, गुर्वेच्छा, गुरुदर्शन, गुरुनाम हे त्यांच्या गुरुसेवेचे वैशिष्ट्य होय ! गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम त्यांनी मनामध्ये कुठलाही विकल्प किंवा शंका न ठेवता पूर्ण केले. ‘मी कुणी नाही. सर्व काही सद्गुरु राऊळबाबा आहेत’, हाच विचार त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होता. प.पू. राऊळबाबांविना दुसरा कोणताच विचार त्यांनी केला नाही.

१ आ. स्वप्नदृष्टांत हीच गुरूंची आज्ञा समजून गुरुकार्यासाठी देह झिजवणे ! : वर्ष १९८५च्या जानेवारी मासात प.पू. राऊळ महाराज पिंगुळी येथे समाधीस्थ झाल्यानंतर प.पू. अण्णा महाराजांच्या गुरुसेवेला वेगळीच धार आली. एकदिवस समाधीस्थ असलेल्या राऊळबाबांनी प.पू. अण्णांना झोपेतून जागे करून सांगितले, ‘विन्या, वाट कोणाची बगतस (बघतोस)? मी हय बसलय तो कशाक ? (मी येथे बसलो आहे तो कशासाठी ?) काम चालू कर.’ हीच गुरुआज्ञा समजून प.पू. अण्णांनी जे काम हाती घेतले, ते आजपर्यंत चालूच आहे. त्यांनी वर्ष १९८५ ते २०१९ या काळात समाधी मंदिर परिसराचा केलेला कायापालट पाहिल्यावर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होते.

१ इ. गुरूंचे सान्निध्य सुटू नये, यासाठी गुरूंच्या समाधीमंदिर परिसरात स्वत:चे समाधी मंदिर बांधणे : गुरूंशी एकरूपता कशी असावी ? याचे आजच्या काळातील जिवंत उदाहरण म्हणजे प.पू. सद्गुरु समर्थ अण्णा महाराज ! ज्या देहाच्या माध्यमातून गुरूंची सेवा घडली, तो देहही गुरूंच्या सान्निध्यात रहावा, अशी दृढ इच्छाशक्ती ठेवून ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी स्वत:चे समाधी मंदिरही प.पू. राऊळ महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात असलेल्या अतिरुद्र स्वाहाकार मंडपामध्ये बांधून ठेवले आहे. काय वर्णन करावे या गुरुप्रेमाचे आणि गुरूंशी असलेल्या एकरूपतेचे ! धन्य तो गुरु आणि धन्य तो शिष्य !’

२. आध्यात्मिक कार्यासह सामाजिक कार्यातही पुढाकार घेणे !

वर्ष १९६० मध्ये प.पू. राऊळबाबांच्या आज्ञेनुसार प.पू. अण्णांनी पिंगुळीमध्ये अन्नदान चालू केले, ते आजतागायत चालू आहे. यातच प.पू. अण्णांना स्वर्गीय आनंद वाटतो. प.पू. अण्णा गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना, गरीब कुटुंबांना, तसेच सहस्रो आजारी माणसांना साहाय्य करत. त्यांनी पिंगुळी गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम प.पू. अण्णांनीच गावात प्रथम चालू केली. त्यांनी गावाला स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळवून दिले. – एक भक्त

प.पू. राऊळ महाराज यांचे सनातनशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !

प.पू. विनायक राऊळ महाराज (डावीकडे) यांच्याशी संवाद साधतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (गोवा, ६.८.२०००)

१. सनातन संस्थेच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘देश, धर्म अन् हिंदु संस्कृती टिकवण्यासाठी सनातन संस्था सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. या कार्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श घेऊनच संस्थेचे सहस्रावधी साधक तन, मन अन् धन अर्पून निःस्वार्थपणे कार्यरत आहेत.’

– प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज, पिंगुळी, जिल्हा सिंधुदुर्ग. (वर्ष २०१२)

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करणारे प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज !

‘प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज कितीही व्यस्त असले, तरी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत असत. प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिरात साजर्‍या होणार्‍या मोठ्या उत्सवांच्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आवर्जून विज्ञापनेही देत असत, तसेच या उत्सवांच्या वेळी समाधी मंदिरात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष लावण्यासही ते अनुमती देत असत.’

३. सनातनच्या साधकांचे कौतुक करणे आणि हिंदु राष्ट्राच्या कार्याला आशीर्वाद देणे

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज नेहमी म्हणत, ‘‘सनातनचे साधक स्वतःसाठी काही मागत नाहीत. साधक निःस्वार्थ भावनेने कार्य करत आहेत. माझे हिंदु राष्ट्राच्या कार्याला आशीर्वाद आहेत.’’