‘त्यांना’ केवळ विनाश आणि हत्या हव्या आहेत ! – पंतप्रधानमोदी यांची पाकवर नाव न घेता टीका

‘त्यांना’ विनाश आणि हत्या हव्या आहेत, तर भारताने त्यांना तसे करू देत रहायचे का ? पाकच्या हिंसेला प्रत्युत्तर देऊन त्याला वठणीवर आणले पाहिजे, हे पंतप्रधानांनी लक्षात घ्यावे, अशीच जनतेची इच्छा आहे !

कोलंबो (श्रीलंका) – जगभरात शांतता राखण्यामधील सर्वांत मोठा अडसर हा वाद नाही, तर एक विशेष विचारधारा आहे. द्वेष आणि हिंसा यांच्या विचारात आकंठ बुडालेले लोक शांततेचे शत्रू आहेत. आपल्या क्षेत्रातील आतंकवादाची समस्या हिंसेची विचारधारा दर्शवणारी आहे. द्वेषाची विचारधारा पसरवणारे चर्चेला नकार देतात. त्यांना फक्त विनाश आणि हत्या हव्या आहेत, अशी टीका पाकने नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर केली. पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. कोलंबोत बौद्ध धर्माचा १४ वा आंतरराष्ट्रीय दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

भारत ही गौतम बुद्धांची शांततेचा संदेश देणारी भूमी आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून भारत-श्रीलंकेचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळे बुद्धांच्या चैतन्यभूमीत श्रीलंकेतील जनतेसाठी शुभेच्छा घेऊन आलो आहे, असे मोदी म्हणाले.

कोलंबो आणि वाराणसी यांमध्ये थेट विमानसेवा चालू करण्याची घोषणा मोदी यांनी या वेळी केली. येत्या ऑगस्टपासून ही विमानसेवा चालू होईल. यामुळे श्रीलंकेतील जनतेला बुद्धांच्या भूमीवर सहज येता येईल, असे मोदी म्हणाले.