५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील चि. अभीर जयेश दांगट (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अभीर जयेश दांगट आणि कु. स्वरा सुधीर महाडिक हे आहेत !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अभीर दांगट

१. जन्मापूर्वी

अ. ‘चि. अभीरची आई (माझी मुलगी) सौ. श्रद्धा जयेश दांगट ही गर्भधारणा झाल्यापासून प्रतिदिन ध्यानधारणा करायची, श्रीरामरक्षास्तोत्र म्हणायची, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायची. त्या वेळी बाळाची हालचाल होत असे. तेव्हा ‘बाळशांतपणे हे सर्व ऐकत आहे आणि बाळाला आनंद होऊन ते उड्या मारत आहे’, असे तिला वाटायचे.

आ. गर्भधारणा झाल्यापासून प्रसुती होईपर्यंत श्रद्धाला कसलाच त्रास झाला नाही. ती अगदी ९ मास पूर्ण होईपर्यंत कार्यालयात जात होती. जणू ‘बाळच तिची काळजी घेत आहे’, असे तिला जाणवायचे.

२. प्रसुतीच्या वेळी

श्रद्धाला प्रसुती वेदना चालू झाल्या. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. सगळीकडे पाणी भरत होते. आम्हीप्रार्थना करून रुग्णालयात जायला निघालो. तेव्हा पाऊस एक घंटा पूर्णपणे थांबला. कसलाही त्रास न होता आम्ही सगळे रुग्णालयात पोचलो. प्रसुतीच्या वेळी कुठलीही अडचण आली नाही.

३. जन्म ते १ वर्ष

अ. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ पुष्कळ सुंदर आणि तेजस्वी दिसत होते. आधुनिक वैद्यांनी बाळाला बाहेर आणून आमच्याहातात दिले. तेव्हा मी बाळाच्या कानात जयघोष केला. त्या वेळी त्याने डोळे उघडून प्रतिसाद दिल्याचे जाणवले.

आ. अभीरला अंघोळ घालतांना आणि तेल लावतांना आम्ही भ्रमणभाषवर नामजप लावत असू. तेव्हा ‘बाळाला पुष्कळ आनंदहोत आहे’, असे वाटायचे.

इ. अभीर अंघोळ करतांना जराही रडत नसे. त्या वेळी तो ओरडून प्रतिसाद द्यायचा. हे पाहून अंघोळ घालणार्‍या मावशीसुद्धा आश्चर्य व्यक्त करायच्या.

ई. बाळाला सांभाळतांना मला पुष्कळ आनंद जाणवतो.

उ. त्याला ‘बाळगुटी’ देतांना स्तोत्र आणि रामरक्षा लावली की, तो पुष्कळ आनंद व्यक्त करायचा. तो ती स्तोत्रे शांतपणे ऐकतअसे.

ऊ. अभीरला ‘श्री बगलामुखी स्तोत्र’ ऐकायला पुष्कळ आवडते. त्याला श्लोक, जप आणि गाणी ऐकायला पुष्कळ आवडतात. तो आईला हुंकार देऊन ‘परत परत म्हण’, असे सांगतो.

​‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर, ‘अभीरमध्ये मला तुमचेच बालरूप पहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करूनमी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. मुक्ता देशपांडे (आजी), कोलशेत, ठाणे. (ऑगस्ट २०२०)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता