परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेचा देवता आणि संत यांनी केलेला गौरव

महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुढील कार्यासाठी आध्यात्मिक शक्ती प्रदान केली. प्रत्यक्षातही महर्षींनी ‘श्री महालक्ष्मीचा अंशावतार’ असा ज्यांचा गौरव केला आहे, त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांशी एकरूप झाल्याच्या अनुभूती अनेकांना येतात. देवता आणि संत यांनाही त्यांच्यातील वेगळेपण जाणवते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना त्यांचा उच्च अधिकार लक्षात येतो. निसर्गही वेळोवेळी साक्ष (शुभसंकेत) देऊन त्यांच्या अवतारत्वाची प्रचीती देतो. या लेखात देवता आणि संत यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरुद्वयी यांच्याविषयी काढलेले वैशिष्ट्यपूर्ण गौरवोद्गार देत आहोत.

डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीने सन्मान केल्यानंतरचा क्षण ! (वर्ष २०१९)

परात्पर गुरुदेवांची सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असल्याप्रमाणे साधकांचा आधार बनलेल्या या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी वंदन !

प.पू. आबा उपाध्ये यांना परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरुद्वयी यांच्या आवाजात समान गोडवा जाणवणे

प.पू. आबा उपाध्ये

वसंत ऋतूमध्ये कोकिळा गाते. कोकिळेचे सूर ऐकायला आपण सगळे आतूर असतो. कोकिळेचे सूर ऐकल्यावर आपल्याला बरे वाटते. त्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई यांचा आवाज ऐकल्यावर बरे वाटते. प.पू. डॉक्टरांचे साधक आणि सद्गुरु सगळ्यांचेच आवाज कोकिळेसारखे आहेत. त्याचे मुख्य प्रतीक म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजलीताई आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई ! श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या गंगा, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या नर्मदा नदीसमान आहेत. गंगा आणि नर्मदा या नद्या शेवटी समुद्राला मिळतात. त्या समुद्राप्रमाणेच सनातनचे कार्य होणार आहे.

– प.पू. आबा उपाध्ये, पुणे (१.११.२०१७)

धर्मसूर्यासम कार्य करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज

‘रामनाथी आश्रमात प्रतिदिन एक सूर्य उगवत नाही, तर प्रतिदिन दोन सूर्य उगवतात. एक म्हणजे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि दुसरे म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ! निसर्गातील सूर्य प्रकाश देतो, तर रामनाथी आश्रमातील सूर्य धर्मनिष्ठांवर धर्मज्ञानाचे प्रोक्षण करतो. पुढच्या काळात मी जिवंत असेन कि नाही, हे मला ठाऊक नाही; पण हिंदु राष्ट्राची निर्मिती झाल्यावर तो सूर्य रामनाथी आश्रमात असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सूर्यफुलाच्या माध्यमातून अर्पण होईल. त्यातील दोन पाकळ्या म्हणजे या सद्गुरुद्वयी असतील.’

– ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज

गुरूंनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वाणी सिद्ध केली आहे !

पू. (प्रा.) अशोक नेवासकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांच्या पूजनाच्या वेळी किरणांच्या माध्यमातून सर्व गुरूंची पुण्याई श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींमध्ये जातांना दिसली. या सगळ्या प्रक्रियेतून गुरूंनी सद्गुरुद्वयींना ‘दासोऽहम्’ भावात आणले, म्हणजे ‘मी गुरूंचा दास आहे’, या स्थितीत आणले. हनुमंत हा प्रत्यक्ष रुद्राचा अवतार होता, तरीही तो दास्य भावात किंवा ‘दासोऽहम्’ भावात राहून श्रीरामाचा दास असल्याप्रमाणे कार्य करत होता. सद्गुरुद्वयींचेही तसेच झाले आहे. आता अध्यात्मातील त्यांचा पुढील प्रवास ‘दासोऽहम्’ भावातून ‘सोऽहम्’ भावाकडे गुरुच करवून घेतील ! १९.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याकडील दिव्याने तुम्हा दोघींच्या हातांतील दिव्याची ज्योत पेटवली. या कृतीच्या माध्यमातून गुरूंनी सद्गुरुद्वयींमधील ज्ञानज्योतच प्रज्वलित केली आहे. या कृतीतून त्यांनी एक प्रकारे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वाणी सिद्ध केली असून यापुढे ‘त्या जे काही बोलतील, ते संकल्पाच्या स्वरूपातच कार्य करील, म्हणजे त्या जे बोलतील, ते ब्रह्मवाक्यच ठरेल.’

–  पू. अशोक नेवासकर, नाथ संप्रदायाचे संत, नगर

परात्पर गुरुदेवांची शक्ती प्रथम स्वतः ग्रहण करून साधकांना पेलवेल, इतक्या प्रमाणात प्रक्षेपित करणार्‍या श्रीमहालक्ष्मीस्वरूप सद्गुरुद्वयी !

सद्गुरु चारुदत्त पिंगळे

श्रीविष्णु क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असतांना श्री लक्ष्मी आतुरतेने श्री विष्णूच्या मुखारविंदाकडे अखंड बघत असते. श्रीविष्णु कोणत्याही क्षणी नयन उघडतील आणि ‘तो क्षण चुकू नये’; म्हणून श्री महालक्ष्मीदेवी निरंतर श्रीविष्णूचे मुख न्याहाळत असते. आज गुरुदेवांनी हे लक्षात आणून दिले की, ‘प्रत्यक्षात महालक्ष्मीद्वयी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) श्रीविष्णूंचे (परात्पर गुरुदेवांचे) मुखारविंद सतत न्याहाळत आहेत; कारण श्रीहरि जेव्हा योगनिद्रतून जागे होऊन डोळे उघडतील, त्या वेळी त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात प्रक्षेपित होणारी शक्ती त्यांच्या भक्तांना (लेकरांना) पेलवणे शक्य नाही. त्यामुळे प्रथम त्या दोघी ती शक्ती ग्रहण करतात आणि भक्तांना झेपेल, इतकीच शक्ती त्या प्रक्षेपित करतात.

‘ब्रह्मांडाचा पसारा सांभाळणारे आणि भक्तांचा (लेकरांचा) आध्यात्मिक उत्कर्ष करू इच्छिणारे ‘त्वमेव माता च पिता त्वमेव ।’ (अर्थ : तुम्हीच आमचे आई आणि वडील आहात.) या ईश्वरी तत्त्वाचे पृथ्वीवरील सगुण रूप म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले’ आहेत अन् श्री महालक्ष्मीदेवीचे स्वरूप म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत’, याची जाणीव भगवंताने करून दिली.’

– आधुनिक वैद्य (सद्गुरु) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमाचे दोन नेत्र असून तिसरे नेत्र म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आहेत ! – श्री विद्याचौडेश्वरीदेवी

श्री विद्याचौडेश्वरीदेवी

‘तुम्ही दोघी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आश्रमाचे दोन नेत्र आहात आणि तिसरे नेत्र म्हणजे (परात्पर गुरु) डॉक्टर. दोन नेत्र उघडे आहेत आणि तिसरे बंद आहे. या दोन नेत्रांमध्ये धुळीचा कणही जाणार नाही, अशी दक्षता मी घेईन. तुम्हाला जे आरोग्यासंबंधी त्रास होत आहेत, तेही मी ठीक करीन’, असे आशीर्वाद हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्रीविद्याचौडेश्वरीदेवीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिले. या माध्यमातून ‘चिंता करू नका. इथून पुढे ‘डोळ्यांतून अश्रू येतील’ अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होणार नाहीत’, असे देवीने सांगितले.

– कु. प्रियांका लोटलीकर (२.१२.२०१९)

देवतांचे अवतार असलेल्या सनातनच्या गुरुपरंपरेची महती !

श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवी

‘(परात्पर गुरु) डॉ. आठवले या एकट्या व्यक्तीने आरंभलेली ही संस्था आज सहस्रो साधकांना साधना शिकवत आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोन्ही सद्गुरु श्री राजराजेश्वरी देवीप्रमाणे सनातनच्या श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वतीच आहेत.’

– श्री. पवनकुमार यजमान, तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे भक्त

गुरुशक्ती-प्रदान सोहळ्याच्या दिवशी सकाळी ‘चंद्राचा रंग सूर्याप्रमाणे लालसर दिसणे’, सद्गुरुद्वयींच्या एकरूपतेचे प्रतीक !

कु. प्रियांका लोटलीकर

सोहळ्याच्या दिवशी पौर्णिमा असल्याने सकाळी आकाशात चंद्र दिसला; मात्र त्याचा रंग सूर्याप्रमाणे लालसर दिसत होता. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये अनुक्रमे सूर्यतत्त्व अन् चंद्रतत्त्व असल्याचे महर्षींनी सांगितले आहे. ‘चंद्राचा रंग लालसर होणे म्हणजे सूर्य आणि चंद्र एकप्रकारे एकरूप झाल्याचे प्रतीक आहे’, असे मला जाणवले. सोहळ्यात महर्षींनी ‘माघ पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही गुरु एकमेकांशी एकरूप होतील’, असे सांगितले होते. यावरून ‘सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू या निराळ्या नसून एकच आहेत’, याचा दैवी संकेत चंद्राच्या रंगाच्या माध्यमातून मिळाल्याचे लक्षात आले.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.२.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक