पुणे शहराला ५० टन ऑक्सिजनची आवश्यकता

पुणे, ५ मे – रुग्णांची संख्या अल्प होत असली, तरी ऑक्सिजनची मागणी मात्र वाढत चालली आहे. अन्य ठिकाणीसुद्धा ऑक्सिजन बेडची सुविधा वाढवण्याचे प्रयत्न चालू केले आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांसाठी मिळून अनुमाने ५० टन ऑक्सिजनची आवश्यकता महापालिकेला भासणार आहे. तेवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेच्या विद्युत् विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. तसेच ६०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटरसुद्धा उभारले आहे. या सर्व रुग्णालयांना मिळून सध्या प्रतिदिन ४० ते ४२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासते; परंतु तेवढासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. जेमतेम ३५ ते ३६ टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो.