रेमडेसिविर पुरवणार्‍या आस्थापनावरील बंदी उठवल्यामुळे पुण्यात रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत

पुणे, ६ मे – भाग्यनगर येथील आस्थापनाच्या रेमडेसिविर इंजेक्शनमुळे कोरोना रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात निदर्शनास आला होता; मात्र शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना याच आस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर पुरवण्यात येते. शहरासह जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये; म्हणून सिप्ला आस्थापनाला अतिरिक्त पुरवठा करण्याची विनंती करण्यात आली होती. तरीही मागणीपेक्षा अल्प पुरवठा होत असल्याने संबंधित आस्थापनाला पुन्हा रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे. संबंधित आस्थापनाच्या इंजेक्शनच्या पुरवठ्यास घालण्यात आलेली बंदी २ दिवसांतच उठवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफ्.डी.ए.) सदोष इंजेक्शनची चौकशी चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापनाकडून सदोष पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शन परत मागवण्यात आले असून त्यानंतर करण्यात येणार्‍या इंजेक्शनचा पुरवठा पूर्वीप्रमाणेच परिणामकारक असल्याची निश्‍चित करण्यात आली आहे. नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. त्यामुळे रेमडेसिविरसंदर्भातील स्थिती पूर्वपदावर आली आहे.