पू. सौरभ जोशी यांची सेवा करतांना श्री. समृद्ध चेऊलकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

 

पू. सौरभ जोशी

रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. समृद्ध चेऊलकर सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या सेवेत असतात. पू. सौरभदादा जन्मतःच विकलांग असल्याने ते स्वतःचे काहीही करू शकत नाहीत. पूर्वी ते बोलू शकत नव्हते; मात्र आता ते बोलू लागले आहेत. ते साधकाला उद्देशून अचूक शब्द उच्चारतात. चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी (४.५.२०२१) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पू. सौरभदादांच्या सेवेत असतांना श्री. समृद्ध यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. सौरभ जोशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पू. सौरभदादांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर

१ अ. शारीरिक मर्यादा असूनही सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असणे

१ अ १. इतरांकडून अपेक्षा न केल्यास आनंदी रहाता येणे : प्रारंभी ‘पू. सौरभदादा सतत आनंदी कसे राहू शकतात ?’, हे माझ्या लक्षात येत नसे. काही दिवसांनी देवाच्या कृपेने माझ्या मनात आले, ‘पू. सौरभदादा इतरांकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत. त्यांच्या मनात मायेतील कोणतीही इच्छा नसून केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच विचार असतात.’ यातून ‘इतरांकडून कोणतीही अपेक्षा न करता केवळ ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिल्यास आनंदी रहाता येते’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.

१ अ २. सर्वत्र परात्पर गुरु डॉक्टरांना पहाणे : ‘शारीरिक मर्यादा असूनही सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात कसे रहायचे’, याचे आदर्श उदाहरण म्हणून पू. सौरभदादांकडे पहाता येईल. ते त्यांच्या खोलीत सतत झोपून असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांची पुष्कळ काळापासून भेट झालेली नाही. पू. सौरभदादा सर्वत्र परात्पर गुरु डॉक्टरांना पहातात. ते वारंवार त्यांना ‘श्री’ असे हाका मारतात.

१ आ. निरपेक्ष प्रीती

१ आ १. साधकांच्या वडिलांची विचारपूस करणे : माझ्या वडिलांना (श्री. प्रसाद चेऊलकर यांना) नोकरीनिमित्त विदेशात जावे लागले. मी पू. सौरभदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर ते ‘बाबा’ असे म्हणून मला माझ्या वडिलांविषयी विचारतात. त्यानंतर काका-काकू (पू. सौरभदादांचे आई-वडील) मला माझ्या वडिलांचे क्षेमकुशल विचारतात. मी बहुतेक वेळा दुपारच्या चहानंतर त्यांच्या खोलीत सेवेला जातो. त्या वेळी पू. सौरभदादा ‘बाबा’ आणि ‘मंमं (भोजन)’ असे म्हणतात. तेव्हा त्यांना ‘तुझ्या बाबांचे जेवण झाले का ?’ असे विचारायचे असतेे. प्रथम मला ‘ते चहाच्या वेळी बाबांच्या जेवणाविषयी का विचारत आहेत ?’, असा प्रश्‍न पडत असे; पण नंतर ‘त्या देशातील वेळ भारताच्या वेळेपेक्षा दीड घंटा मागे असल्यामुळे आपल्याकडे चहाची वेळ असते, तेव्हा तेथे भोजनाची वेळ असते’, हे माझ्या लक्षात आले.

१ आ २. साधकाच्या वडिलांचे प्रेमाने स्वागत करणे : माझे बाबा विदेशातून ७ मासांनी रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी ते पू. सौरभदादांना भेटायला गेले. त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवण्यापूर्वीच आतून पू. सौरभदादा आनंदाने ‘या’ असे म्हणाले. त्यांना माझ्या बाबांना भेटतांना ‘एखादी अगदी जवळची व्यक्ती भेटावी’, एवढा आनंद झाला होता.

१ आ ३. एकदा त्यांना मला ‘आई कशी आहे ?’ असे विचारायचे होते. त्या वेळी त्यांनी तिचा उल्लेख ‘मम्मा’, असा केला. ‘माझ्या आईला मी ‘मम्मा’ म्हणतो’, हे मी त्यांना कधीही सांगितले नव्हते.

१ इ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

१ इ १. खोलीत जाण्यासाठी चढाव्या लागणार्‍या जिन्यातील पायर्‍यांची संख्या अचूक सांगणे : एकदा रामनाथी आश्रमातील पू. सौरभदादा रहात असलेल्या खोलीत दुरुस्ती करायची असल्याने त्यांना वरच्या मजल्यावरील खोलीत हालवले होते. सेवा संपल्यानंतर ‘पू. सौरभदादांना वरच्या खोलीत कसे नेले, त्यांचे सर्व साहित्य वरच्या मजल्यावर कसे नेले’, याविषयी मी २ साधकांशी बोलत होतो. त्या वेळी पू. सौरभदादा ‘१८’ असे ५ – ६ वेळा म्हणाले. त्या वेळी ‘ते काय सांगत आहेत ?’, ते आमच्या लक्षात येत नव्हते. तेव्हा एका साधकाने ‘तुमच्या नवीन खोलीत येण्यासाठी लागणार्‍या जिन्यातील पायर्‍यांची संख्या तुम्ही सांगत आहात का ?’, असे विचारल्यावर ते ‘हो’, असे म्हणाले. नंतर आम्ही त्या पायर्‍या मोजल्यावर त्यांची संख्या १८ होती.

१ इ २. ‘साधकाला वाहन चालवण्याचा परवाना मिळाला’, हे जाणून ‘व्हील’ आणि ‘खाऊ’ हे शब्द उच्चारणे : काही दिवसांपूर्वीच मला वाहन चालवण्याचा परवाना मिळाला. मी याविषयी कधीही पू. सौरभदादांशी बोललो नव्हतो. मला परवाना मिळाला, त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत सेवेला गेलो. मला ते पुष्कळ आनंदी दिसले आणि त्या आनंदात ते काहीतरी बोलत होते. त्या वेळी मला आणि सौ. काकूंना ‘ते असे का करत आहेत’, हे लक्षात येत नव्हते. काही वेळाने ते पुनःपुन्हा ‘व्हील’ आणि ‘खाऊ’ असे म्हणू लागले. त्यावरून ‘मला वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्यामुळे त्यांना आनंद झाला असून त्यासाठी त्यांना मला खाऊ द्यायचा आहेे’, हे माझ्या लक्षात आले.

१ इ ३. ‘साधकाला ‘कॅल्शियम’ मिळण्यासाठी केळे खाण्याची आवश्यकता आहे’, हे जाणून ‘साधक केळे खात आहे ना ?’, याची चौकशी करणे : मला ‘ब्रेड टोस्ट’ आणि ‘चीज’ पुष्कळ आवडते. मी पू. सौरभदादांना याविषयी कधीही सांगितले नव्हते किंवा तसा उल्लेखही केला नव्हता; पण त्यांना ते ठाऊक आहे. ते बर्‍याचदा याविषयी मोठ्याने बोलतात. माझ्यात ‘कॅल्शियम’ची कमतरता असल्याने मला केळी खायला सांगितली आहेत. ‘मी नियमितपणे केळे खात आहे ना ?’, याची ते आवर्जून चौकशी करतात. त्यांनी मला ‘क्यूट’, असे म्हणायला आरंभ केला आहे.

१ इ ४. ‘साधकाने चहा घेतला नाही’, हे ओळखणे : एकदा मी चहा न घेताच त्यांच्या खोलीत सेवेला गेलो होतो. त्या दिवशी ते सातत्याने ‘चहा’ असे म्हणत माझ्याकडे बघत होते. काही वेळाने सौ. जोशीकाकूंनी त्यांना ‘समृद्धने चहा घेतला आहे का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

१ इ ५. ‘साधक प्रार्थना करायला विसरला आहे’, हे जाणून ‘श्री’ असे म्हणणे : पू. सौरभदादांची सेवा करतांना जेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विस्मरण होतेे अथवा माझ्यातील ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूमुळे मी प्रार्थना करायला विसरतो, तेव्हा पू. सौरभदादा ‘श्री’ असे म्हणतात. त्यामुळे ‘मी प्रार्थना करायला विसरलो आहे किंवा कर्तेपणा घेत आहे’, हे माझ्या लक्षात येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, याची मला जाणीव होते.

१ इ ६. ‘साधकाच्या आजोबांचे निधन होणार आहे’, हे जाणून तोंडवळा गंभीर करणे

​३१.७.२०१८ या दिवशी संध्याकाळी मी पू. सौरभदादांच्या खोलीत सेवेला गेलो. त्या वेळी ते ‘बाबा’ असे म्हणत होते. ते एरव्ही माझ्या वडिलांची चौकशी करण्यासाठी ‘बाबा’ असे म्हणतात. जोशीकाकांनी (पू. सौरभदादांच्या वडिलांनी) त्यांना ‘चेऊलकरकाका बरे आहेत ना ?’, असे विचारल्यावर पू. सौरभदादांनी आश्‍चर्यकारकरित्या ‘नाही’ असे उत्तर दिले. ते ऐकून काकांनी ‘त्यासाठी तुम्ही काही कराल का ?’, असे विचारले. त्यावर ते ‘नाही’ असे म्हणाले. ‘श्री (परात्पर गुरु डॉ. आठवले) काही करतील का ?’, असे विचारल्यावरही ते ‘नाही’ म्हणाले. काही वेळाने ‘हा प्रारब्धाचा भाग आहे का ?’, असे त्यांना विचारल्यावर मात्र ते ‘हो’ असे म्हणाले. त्या वेळी त्यांच्या बोलण्यात गांभीर्य होते आणि त्यांचा तोंडवळाही नेहमीच्या तुलनेत गंभीर होता.

​मी पू. सौरभदादांच्या खोलीत दिवसातून एकदाच सेवेसाठी जातो; पण त्या दिवशी त्यांच्या खोलीत सेवा करणार्‍या दुसर्‍या एका साधकाला बरे वाटत नसल्याने त्याने मला त्याची सेवा करण्याची विनंती केली. त्यामुळे मी त्यांच्या खोलीत दोन वेळा गेलो. त्यानंतर पुन्हा सौ. जोशीकाकूंचा निरोप आल्याने मी त्यांच्या खोलीत तिसर्‍यांदा गेलो. ‘काहीतरी होणार आहे’, याची कल्पना देवाला असल्यामुळे त्याने माझ्याकडून दिवसातून ३ वेळा पू. सौरभदादांची सेवा करून घेतली. काही वेळानंतर आम्हाला माझ्या आजोबांचे निधन झाल्याचे समजले. मला तातडीने मुंबईला जावे लागले.

त्या वेळी मला पू. सौरभदादांचे बोलणे आठवले. ते माझ्या आजोबांच्या प्रारब्धाविषयी बोलत होते. ते आठवून माझा भाव जागृत झाला.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : पू. सौरभदादांच्या खोलीत सेवेला गेल्यावर त्यांची आनंदावस्था आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा त्यांचा भाव पाहून मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले कलियुगातील श्रीराम आहेत, तर पू. सौरभदादा त्यांचे कलियुगातील परमभक्त हनुमान आहेत.

२. पू. सौरभदादांच्या खोलीत सेवेसाठी गेल्यावर मनातील नकारात्मक विचार नष्ट होण्यासंदर्भात आलेल्या अनुभूती

अ. ‘एकदा मी माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार सौ. प्राजक्ताकाकूंना (पू. सौरभदादांच्या आईंना) सांगत होतो. त्यावर त्या मला योग्य दृष्टीकोन देत होत्या. त्या वेळी पू. सौरभदादा मधून मधून ‘माइंड’ असे म्हणत होते. त्यावरून ‘मनमोकळेपणाने बोलून मन निर्मळ कर आणि ते ईश्‍वरचरणी अर्पण कर’, असे ते सुचवत आहेत’, असे मला जाणवले.

आ. काही वेळा माझ्यातील ‘इतरांकडून अपेक्षा करणे’ या स्वभावदोषामुळे माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येतात; पण पू. सौरभदादांच्या खोलीत सेवा करायला गेल्यावर १५ ते २० मिनिटांतच ते विचार नष्ट होतात आणि मला आनंद मिळू लागतो.

इ. मी बारावी इयत्तेत शिकत असतांनाचा एक प्रसंग मला आठवतो. त्या वेळी (अभ्यास करायचा असल्याने) माझ्याकडे कोणतीही सेवा नव्हती. त्यामुळे ‘माझ्याकडे सेवा नाही, याचाच अर्थ माझी साधना होत नाही’, अशा स्वरूपाचे नकारात्मक विचार माझ्या मनात यायचे. मी सद्गुरु सिरियाक वाले यांना हे विचार सांगितले. त्यावर सद्गुरु सिरियाकदादा म्हणाले,

‘‘पू. सौरभ जोशी यांच्याकडे पहा. ते कोणत्याही प्रकारची सेवा करू शकत नाहीत. ते संगणकावरही सेवा करू शकत नाहीत, तरीही त्यांनी संतपद प्राप्त केले आहे. याचे कारण साधना ही आंतरिक प्रक्रिया आहे.’’

३. कृतज्ञता

​पू. सौरभदादांची सेवा करतांना मला पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली. मला त्यांच्या सेवेची संधी दिल्याविषयी मी श्रीकृष्णाच्या पावन चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. पू. सौरभदादांच्या सेवेतून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती लिहून देण्याची सुंदर संधी उपलब्ध करून दिल्याविषयी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१८)

कु. मधुरा भोसले

पू. सौरभ जोशी यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ आठवले : पू. सौरभदादा घरी असते, तर त्यांना कुणी संत म्हणून ओळखलेच नसते. सर्व लोकांनी त्यांना सामान्य व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले असते. बरे झाले ते सहकुटुंब आश्रमात आले. त्यामुळे आपल्याला त्यांचे संतत्व पहायला मिळते आणि त्यांची सेवा करून त्यांची काळजीही घेता येते. पू. सौरभ यांची देहबुद्धी किती अल्प आहे. ते पलंगावर सतत झोपून असूनही अखंड आनंदावस्थेत असतात. आपल्याला आजारपणामुळे थोडा वेळ जरी झोपून रहावे लागले, तरी आपली चिडचीड होते.

कु. मधुरा भोसले : पू. सौरभदादा रामनाथी आश्रमात आल्यामुळे त्यामुळे देश-विदेशांतून आलेले विविध जिज्ञासू, धर्माभिमानी आणि साधक यांना त्यांचे दर्शन मिळते अन् त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती घेता येते. प.पू. डॉक्टर, आम्हा साधकांना पू. सौरभदादांसारख्या अलौकिक संतांचे दर्शन आणि सहवास केवळ तुमच्या कृपेमुळेच मिळत आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

वयाने लहान असलेले आणि बहुविकलांग अवस्थेतही संतपदी विराजमान झालेले पू. सौरभ जोशी यांच्याप्रतीचा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भक्तीभाव !

​‘वर्ष २०१६ मध्ये एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून महर्षींच्या आज्ञेनुसार दैवी प्रवासाला निघण्यापूर्वी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ सनातनचे बहुविकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी (पू. दादा) यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये गेल्या. त्या वेळी पू. दादा विश्रांती घेत होते. त्यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. दादांचे चरण आणि हात यांना हळुवार स्पर्श करून प्रार्थना केली, ‘पू. दादा, तुमचे शब्दांपलीकडील चैतन्य मला आणि दैवी प्रवासाच्या सेवेतील सर्व साधकांना मिळू दे अन् आमच्याकडून त्या चैतन्याच्या बळावर उत्तम सेवा होऊ दे.’

– श्री. दिवाकर आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जून २०२०)