केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी जातांना सोबत कागदपत्रे घेऊन घरात गेले ! – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


सांगली, २५ एप्रिल – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी जातांना सोबत कागदपत्रे घेऊन घरात गेले. या धाडीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणती कागदपत्रे जप्त केली याचा तातडीने खुलासा करावा. एका महिला याचिकाकर्त्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला अन्वेषणाचे आदेश दिले; मात्र सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार याचा उपयोग करून घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, देशमुखांविरोधात थेट गुन्हा नोंद करणे अत्यंत गैर आहे. (असे म्हणणे म्हणजे अन्वेषण यंत्रणांपेक्षा स्वत:ला अधिक कळते असेच होय ! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरूनच हे अन्वेषण चालू आहे आणि त्यात काही पुरावे आढळल्यानेच केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी गुन्हा नोंद केला असणार ! ज्यांनी काही काळ गृहंमत्री म्हणून काम केले आहे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करू नये ! – संपादक)

महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी या धाडीच्या वेळी कोणकोणती गैरकृत्ये आणि त्यांच्याशी संबंधित असणारी कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत याचा खुलासा करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणी प्राथमिक अन्वेषण काय केले ते न्यायालयासमोर मांडणे आवश्यक आहे.