परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘गुरुपादुका धारण सोहळ्या’च्या वेळी श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सोहळ्याविषयी मिळालेली पूर्वसूचना

१ अ. ‘गुरुपादुका धारण सोहळ्या’पूर्वी २५ दिवसांमध्ये ३ वेळा पादुका दिसणे : ‘१२.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका धारण सोहळा’ झाला. त्या आधी मला मागील २५ दिवसांमध्ये एकाच प्रकारच्या पादुकांचे ३ वेळा दर्शन झाले. मला त्या पादुकांवर ‘ॐ’ दिसत होता. त्या वेळी ‘काही ठराविक दिवसांनंतर मला पादुका का दिसत आहेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका धारण सोहळा’ झाल्यानंतर मला त्याचा उलगडा झाला.

श्री. भूषण कुलकर्णी

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भातील अनुभूती

२ अ. ‘गुरुपादुका धारण सोहळा’ झाल्यावर साधकांचा ‘श्री गुरूंच्या चरणांशी सर्व तीर्थक्षेत्रे आहेत’, हा भाव वृद्धींगत होणार आहे’, असे जाणवणे : ‘वर्ष २००३ मध्ये आश्रमातील काही साधकांचे गोव्यातील काही देवळांतील उत्सव पहाण्याचे नियोजन केले होते. साधक उत्सवाला गेले असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला (मला आणि एक साधक यांना) विचारले, ‘‘तुम्ही उत्सव पहायला गेला नाहीत का ?’’ तेव्हा आम्ही म्हणालो, ‘श्री गुरूंच्या चरणांशी सर्व तीर्थे आहेत. त्यामुळे आम्ही गेलो नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘असा भाव ठेवायला हवा.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका धारण सोहळा’ झाल्यावर साधकांचा ‘श्री गुरूंच्या चरणांशी सर्व तीर्थक्षेत्रे आहेत’, हा भाव वृद्धींगत होत असल्याचे मला जाणवले, तसेच रामनाथी आश्रम आता श्री गुरूंचे तीर्थक्षेत्र झाल्याचे जाणवले.

२ आ. वर्ष २००४ मध्ये ‘सनातनचा आश्रम पुढे तीर्थक्षेत्र होईल’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे होणे : वर्ष २००४ मध्ये आश्रमातील एक साधिका आश्रमाच्या प्रवेशदारापाशी बसमधून उतरल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे दृश्य पाहिले आणि मला विचारले, ‘‘आपल्या आश्रमाजवळ बसही थांबतात का ?’’ त्यावर मी ‘हो’ म्हणालो. ते म्हणालेे, ‘‘आपला आश्रम पुढे तीर्थक्षेत्र होईल. येथे बस तर थांबतीलच; पण त्याही पुढे शासनाच्या सूचीतही आपल्या आश्रमाचे नाव येईल.’’ ‘गुरुपादुका धारण सोहळा’ झाल्यावर मला त्यांच्या वरील वाक्याची प्रचीती आल्याचेे जाणवले.

२ इ. ‘केवळ गुरूंच्या पादुका ठेवून साधकांची प्रगती होत नसून त्यांना मार्गदर्शन करणेेही आवश्यक असते आणि सनातनच्या साधकांना मार्गदर्शन करणारे संत असतील’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : एकदा आश्रमात एका संतांच्या पादुका आल्या होत्या. तो कार्यक्रम झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘गुरूंच्या पादुका हव्यात; पण साधकांना मार्गदर्शन करणारेही हवेत. संप्रदायांमध्ये तसे होत नाही. त्यामुळे अनेकांची पुढे आध्यात्मिक प्रगती होत नाही. उद्या ‘संस्थेतही पादुका असतील कि नाही’, हे ठाऊक नाही; मात्र संस्थेतील साधकांची प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन करणारे संत असतील !’’

३. ‘गुरुपादुका धारण सोहळ्या’च्या वेळी आलेल्या अनुभूती

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यावर आणि संपूर्ण कार्यक्रमात माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

३ आ. संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपण होत असतांना संभाव्य तांत्रिक अडचणी आधीच सूक्ष्मातून दिसून त्यावरील उपाय सुचणेे अन् त्या सोडवता येणे : ‘गुरुपादुका धारण सोहळ्या’चे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण करण्यात येत होते. या वेळी प्रारंभी १० मिनिटे आणि नंतर २ – ३ ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या. त्या ठिकाणी येणार्‍या अडचणी साधक भ्रमणभाषद्वारे सांगायला प्रारंभ करणार, त्याच वेळी त्यांच्याकडील तांत्रिक अडचणी देव सूक्ष्मातून मला आधीच दाखवत होता आणि त्यावर उपायही सुचवत होता. साधकांना उपाय सांगितल्यावर त्यांची अडचण सुटत होती.

३ इ. गुरुपादुकांवर सुगंधी जलद्रव्य प्रोक्षण करत असतांना मला चंदनाचा सूक्ष्म गंध आला.

३ ई. देवता परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी करत असल्याचे सूक्ष्मातून दिसणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी पादुका धारण केल्यानंतर श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या चरणांवर फुले वहात होत्या. त्या वेळी ‘देवता सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला दिसत होते. देवतांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली आणि गुरुदेवांनी पादुका धारण केल्यानंतर पाताळात अन् नरकात वाईट शक्तींच्या दिशेने सूक्ष्मातून वीज लखलखली.

३ उ. गुरुपादुका पूजनानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती होत असतांना मला हलकेपणा जाणवून माझ्या श्‍वासाचीही जाणीव नव्हती. ’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक