स्वामींनी कोणत्याही एका समुदायाला आरक्षण मिळण्यासाठी नव्हे, तर धर्मासाठी लढा दिला पाहिजे ! – श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी, विद्याचौडेश्‍वरी पीठ, कर्नाटक

श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी

तुमकुरू (कर्नाटक) – आमच्यासारख्या स्वामींनी कोणत्यातरी समुदायाला आरक्षण मिळावे; म्हणून नव्हे, तर धर्मासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन तुमकुरू जिल्ह्यातील कुणिगल तालुक्यातील हंगरहळ्ळी येथील विद्याचौडेश्‍वरी पिठाचे श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांनी केले. आरक्षणासाठी विविध समुदायाकडून होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. ‘मी संन्यास घेतल्यानंतर धर्मासाठी लढा देत आहे, आरक्षणासाठी नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धर्मासाठी प्राणार्पण करण्यासही सिद्ध !

श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी पुढे म्हणाले की, देश, भाषा, संस्कृती यांविषयी चिंतन झाले पाहिजे. कोणत्यातरी एका समुदायाच्या आरक्षणासाठी नको. मी मुळात शेतकरी आहे. संन्यास घेतल्यानंतर धर्मासाठी झटत आहे. आरक्षणासाठी नव्हे. धर्म सर्वतोपरी आहे. त्यासाठी मी प्राणार्पण करण्यासही सिद्ध आहे; म्हणून केवळ आरक्षणासाठी लढा देणार नाही. त्या त्या समुदायांचे स्वामी यांनी लढा देणे चुकीचे आहे, असे मी म्हणत नाही. तो त्यांचा वैयक्तिक दृष्टीकोन आहे. मी धर्मासाठी लढा देतो, हा माझा वैयक्तिक अधिकार आहे.

मैसुरू राजघराण्याचे यदुवीर कृष्णदत्त वडियार म्हणाले की, पूर्वी आरक्षण देणे योग्य होते. आज शासनाला जे योग्य वाटते ते शासन करते. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आहे. त्यासाठी सरकार या संदर्भात निर्णय घेईल.