सर्व साधकांना महत्त्वाची सूचना
अनेक साधक संकलन विभागाकडे प्रसारातील अनुभव, अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, साधनाप्रवास, भावप्रयोग, कविता आदी विविध लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवतात. सध्या साधकांकडून येणार्या लिखाणाचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तसेच लिखाण विस्तृत प्रमाणात येत आहे. त्यामुळे त्या लिखाणाची निवड करणे, संकलन करणे आणि ते लिखाण प्रसिद्ध करणे यांमध्ये अडचणी येत आहेत. यापुढे लिखाण पाठवतांना साधकांनी खालील सूत्रे लक्षात घेऊन ते पाठवावे.
१. ‘सनातन प्रभात’साठी कोणते लिखाण पाठवावे ?
अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, पूर्वीच्या त्यांच्या भेटीचे प्रसंग, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, ‘त्यांनी सेवेत, तसेच साधनेत कसे घडवले ?’, याविषयीची सूत्रे आदी लिखाण प्राधान्याने आणि नेमकेपणाने पाठवावे.
आ. सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाठवू शकता.
इ. साधकांना आलेल्या नाविन्यपूर्ण अनुभूती, साधकांच्या जीवनातील काही वेगळे प्रसंग आदी लिखाण थोडक्यात पाठवू शकता.
ई. इतर साधक, तसेच बालसाधक यांची गुणवैशिष्ट्ये पाठवतांना साधकांनी ती थोडक्यात, तसेच वाचकांना समजतील, अशा प्रकारे लिहून द्यावीत. बालसाधकांचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण पाठवण्याविषयी दैनिकात वेळोवेळी चौकटी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या चौकटींची कात्रणे किंवा तो अंक स्वतःकडे ठेवून सर्व पूर्तता करूनच लिखाण संकलन विभागाकडे पाठवावे.
उ. अन्य विषयांवरील नाविन्यपूर्ण लिखाणही अगदी थोडक्यात पाठवावे.
ऊ. तात्कालीन विषय पाठवतांना, उदा. ‘कोरोना’ महामारीविषयी लिखाण पाठवतांना जी माहिती ‘सनातन प्रभात’मधून अगोदरच प्रसिद्ध झाली आहे, तशाच प्रकारचे लिखाण पुन्हा पाठवू नये. त्यापेक्षा निराळी आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती असल्यास ती थोडक्यात पाठवावी.
ए. या काळात काही साधकांचे निधन झाले. मृत साधकांविषयीचे महत्त्वपूर्ण लिखाण त्यांच्या कुटुंबियांनी आणि साधकांनी लवकर पाठवले, तर ते निधनानंतरच्या १० व्या किंवा १२ व्या दिवशी छापणे शक्य होते. बर्याच वेळा हे लिखाण २ – ३ दिवस आधी आल्यामुळे संकलन करून ते दैनिकामध्ये प्रसिद्ध करतांना पुष्कळ घाई होते. असे लिखाण पाठवतांना सोबत मृत साधकाचे छायाचित्र पाठवावे. लिखाणात त्यांच्या वयाचा उल्लेख करावा, तसेच लिहून देणार्यांनी त्यांचे पूर्ण नाव, नाते, गाव आदी सर्व पूर्तता करूनच लिखाण पाठवावे. संकलन विभागाकडे अपुरी माहिती आल्यास सर्व पूर्तता करण्यासाठी समन्वयक साधकांना पुष्कळ वेळ द्यावा लागतो.
२. कोणते लिखाण पाठवू नये ?
अ. साधकांनी मनाच्या स्तरावरील सविस्तर विचारप्रक्रिया लिहून पाठवू नये. ती व्यष्टी साधनेच्या आढाव्यातही सांगता येते.
आ. साधकांनी एकाच वेळी ५ – ६ मोठ्या कविता लिहून पाठवू नयेत. काही वेळा कवितांतील काही ओळी अपूर्ण असतात. त्यांचा अर्थ समजून घेऊन संकलन करणे कठीण होते आणि अधिक वेळ द्यावा लागतो. अनेक साधक खूप मोठ्या कविता पाठवतात. त्यामुळे कवितेतील अनावश्यक भाग काढून ती नीट करण्यासाठी साधकांना वेळ द्यावा लागतो.
लिखाण पाठवणार्या सर्व साधकांनी लिखाणाखाली आपले नाव, वय, गाव, दिनांक आणि संपर्क क्रमांक लिहावा. लिखाणात काही संदर्भ दिले असल्यास ते योग्य असल्याची निश्चिती केलेली असावी, तसेच ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाचा संदर्भ दिला असल्यास शक्यतो त्या अंकाचा दिनांकही घालावा. अन्यथा अशी माहिती शोधण्यात संकलन सेवेतील साधकांचा वेळ वाया जातो.’
जिल्हासेवकांना सूचना
आपल्या जिल्ह्यातील सर्व साधकांनी ‘वरील सर्व सूचना वाचल्या आहेत ना ?’, याची कृपया निश्चिती करावी आणि त्याप्रमाणे लिखाण पाठवण्यासाठी साधकांना प्रवृत्त करावे !
– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२१)