दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ हे सदर वाचून मनातील नोकरी करण्याच्या विचारांवर मात करता येऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊ शकणे

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘साधना ही अर्धवेळ नोकरी नसून पूर्णवेळ नोकरी आहे’, हा गुरुदेवांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विचार वाचून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊ शकणे

श्री. वैभव साखरे

‘मी १० वीत असतांना माझ्या बाबांचे निधन झाले. त्या वेळी मी महाविद्यालयात शिकत असून ५ वर्षे अर्धवेळ नोकरी (पार्ट टाइम जॉब) करत होतो. माझे महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण झाले आणि माझी चांगल्या ५ आस्थापनांमधील ‘कॅम्पस’मध्ये निवड झाली. मला लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. त्यामुळे मला साधनाही करायची होती. त्यामुळे मी ‘पूर्णवेळ साधना करायची कि नोकरी करायची ? किंवा नोकरी करत करत साधना करायची का ?’, या संभ्रमात होतो. त्याच वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधना ही अर्धवेळ नोकरी नसून पूर्णवेळ नोकरी आहे (‘पार्ट टाइम जॉब’ नसून ‘फुल टाइम जॉब’ आहे)’, असा गुरूंचा तेजस्वी विचार वाचला आणि मनातील नोकरी करण्याच्या विचारांवर मात करून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय गुरुकृपेमुळे घेऊ शकलो.

२. ‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देतो’, असा परात्पर गुरूंचा तेजस्वी विचार वाचून ‘साधना करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असे ध्येय ठेवण्याचा दृढ निश्‍चय होणे

मी पूर्णवेळ साधना करत होतो. ३ वर्षांनी पुन्हा माझ्या मनात ‘नोकरी करावी’, असा विचार येऊ लागला; पण मी कधी कुणाला हे सांगितले नाही. त्याच वेळी ‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव, थोडेसे (नोकरीसंबंधी) काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देतो’, असा गुरूंचा तेजस्वी विचार दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचला. तेव्हा माझ्या मनातील नोकरी करण्याविषयीचे विचार गुरुकृपेमुळे क्षणात नाहीसा झाला. ‘साधना करून ईश्‍वरप्राप्ती करायची, असे ध्येय ठेवायचे’, हा दृढ निश्‍चय झाला.

मला गुरूंनी त्यांच्या चरणांशी ठेवल्याविषयी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘गुरुदेव, आम्हाला तुमची अखंड कृपा अनुभवता येऊ दे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील आपले तेजस्वी विचार वाचून ‘साधकांच्या मनातील सर्व अयोग्य विचार निघून जाऊ देत’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. वैभव महेश साखरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२०)         

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक