शासनाकडून ‘रेमडेसिवीर’चे मूल्य निश्‍चित

औषधांचा काळाबाजार होऊ लागल्यावर जागे झालेले अकार्यक्षम प्रशासन !

मुंबई – राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी रेमडेसिवीरच्या १०० मिलीग्रॅम इंजेक्शनच्या एका कुपीची किंमत २ सहस्र ३६० रुपये निश्‍चित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नेमून दिलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाला दिल्या आहेत. या औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयांमध्ये विनामूल्य मिळत आहे; मात्र खासगी रुग्णालये आणि औषधांची दुकाने याठिकाणी त्यासाठी मोठ्या प्रमाणात दर आकारले जात आहेत. या इंजेक्शनची मागणी अधिक असल्याने याचा काळाबाजार केला जातो. त्यामुळे हे इंजेक्शन मिळण्यासाठी धावपळ करावी लागत असून मिळेल त्या किमतीला विकत घ्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कार्यपद्धत निश्‍चित केली आहे.

१. जिल्हा किंवा शहर यांच्या ठिकाणी २४ घंटे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतात. तेथे हे प्रस्ताव घेण्याची सुविधा संबंधित यंत्रणांनी करावी. या ठिकाणी २४ घंटे औषधविक्रेत्याची नियुक्ती करावी. कागदपत्रांची पडताळणी करून प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एका घंट्याच्या आत नेमून दिलेल्या खासगी औषधी केंद्रास कुप्यांची संख्या आणि दर लिहिलेले पत्र द्यावे. तेथून औषधांचा पुरवठा केला जाईल, अशी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२. रुग्णांसाठी रेमडेसिवीरची आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयांनी शहरातील आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये इंजेक्शनची चिठ्ठी, रुग्णाचा कोरोनाचा अहवाल, आधारकार्ड किंवा इतर छायाचित्रे असलेले प्रमाणपत्र आणि रुग्णाची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.