धर्मांधतेचा बळी !

फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरीसमधील एका विद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाला धर्मांधांच्या कट्टरतेमुळे जीव गमवावा लागला. पॅरीसमध्ये भर रस्त्यात या शिक्षकाचे शिर धडावेगळे करण्यात आले. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमेन्युएल मॅक्रोन यांनी हे ‘इस्लामी आतंकवादी आक्रमण आहे’, असे म्हटले आहे. त्यांनी जे म्हटले आहे, त्यावर कुणाचेही दुमत असण्याचे कारणच नाही; कारण शिरच्छेद करण्यासारखी कृती आतापर्यंत इस्लामिक स्टेट, तालिबानी यांसारख्या संघटनांच्या इस्लामी आतंकवाद्यांनीच केली आहे. ही घटना जेथे घडली, तेथून ६०० मीटर अंतरावर काही वेळातच फ्रान्सच्या पोलिसांनी संशयिताला ठार केले. या संशयिताला त्याच्याकडील शस्त्रे टाकून शरण यायला सांगितल्यावर त्याने नकार देत, तो आणखी आक्रमक झाला होता. याचाच अर्थ त्याच्या जिवाचे नंतर काही बरेवाईट झाले, तरी त्याला त्याची काळजी नव्हती. यावरूनच त्याच्यातील धार्मिक कट्टरता दिसून येते. शिक्षकाची हत्या होण्यामागील कारण असे होते की, हा शिक्षक गेले १० दिवस वर्गात प्रेषिताच्या संदर्भातील व्यंगचित्रांवर चर्चा घडवून आणत होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनीही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण असल्याचे म्हटले आहे. खरेतर या घटनेनंतर भारतासह जगभरातील उदारमतवादी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रणेते यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. जगभरातील पुरोगामी आवाज उठवतीलही; पण आतापर्यंतच्या इतिहासावरून भारतातील तथाकथित पुरोगामी धर्मांधांच्या विरोधात आवाज उठवतील, असे वाटत नाही.

धर्मांध दयेच्या पात्रतेचे आहेत का ?

सध्या जो उदारमतवाद किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजले जाते, त्याचा जन्म पाश्‍चात्त्य राष्ट्रांत झाला. ख्रिस्ती धर्मातील चुकीच्या प्रथा, परंपरा मान्य न झाल्यामुळे ‘उदारमतवाद’ जन्माला येणे साहजिक होते. याचाच एक भाग म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ! याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली पॅरीसमधील हा शिक्षक प्रेषिताविषयी विद्यार्थ्यांना सांगत होता; पण फ्रान्स हे पूर्वीचे फ्रान्स राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये आखाती आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांचे एवढे ‘पुनर्वसन’ झाले आहे की, सध्या फ्रान्समधील मुसलमानांची संख्या ८.८ टक्के म्हणजे ५७ लाख ६० सहस्र आहे. यांपैकी १ लाख हे धर्मांतरित आहेत. वर्ष १९९४ पासून मुसलमानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथील शाळांतील विद्यार्थीही या धर्माचे असणारच. फ्रान्समधील हे आतंकवादी आक्रमण गेल्या ३ आठवड्यांतील दुसरे आहे. त्यामुळे धर्मांधांच्या वाढत्या संख्येसमवेतच आतंकवादी आक्रमणेही कशी वाढतात, ते दिसून येते. अनेक पाश्‍चात्त्य देशांनी त्यांच्या उदारमतवादी भूमिकेला अनुसरून इसिसच्या आतंकवादी कारवायांनंतर मध्यपूर्व देशांतील विस्थापित धर्मांधांना सामावून घेतले. हे धर्मांध तेथील स्थानिक महिलांवर अत्याचार करतात, चोर्‍या करतात, खून करतात. असे असूनही त्यांना युरोपमधील देशांनी हाकलून लावलेले नाही; परंतु या धर्मांधांमध्ये त्याविषयी साधी उपकाराचीही भावना नाही. अशांवर दया करावी, त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यावे, असे कधी कुणाला वाटेल का ?

वैचारिक परिवर्तनावर अविश्‍वासच !

शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेषिताविषयी काय सांगत होता ? किंवा तो सांगत होता, चर्चा घडवून आणत होता, ती योग्य होती का ? हा तसा वेगळा विषय आहे. विचारांचा प्रतिवाद विचारांनी व्हावा, अशी सर्वसाधारण सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तीची अपेक्षा असते; पण धर्मांध तसे कधीच करत नाहीत. कुठल्याही देशात धर्मांधांनी त्यांच्या श्रद्धास्थानांच्या कथित अवमानानंतर वैचारिक स्तरावर चर्चेद्वारे आपले म्हणणे पटवून देऊन अवमान रोखण्यासाठी प्रयत्न केला आहे, असे झालेले नाही. भारतात तर केवळ अफवांवरून दंगल आणि जाळपोळ होते. या हिंसक कृती म्हणजे संतापाच्या भरातील सरकारविरुद्धची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असे म्हणावे, तर सरकारी मालमत्ता, वाहने, यांचीच केवळ हानी केली जाते असे नाही, तर बहुसंख्य हिंदूंच्याच घरांची किंवा दुकानांची हानी केली जाते.

हिंदूंची सहिष्णुता प्रकर्षाने जाणवते !

फ्रान्समधील घटनेनंतर हिंदूंमधील सहिष्णुता प्रकर्षाने लक्षात येते. भारतात ‘तनिष्क ज्वेलर्स’ने ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी जाहिरात प्रसिद्ध केली. याविषयी हिंदूंनी वैचारिक स्तरावर विरोध दर्शवला. तनिष्कच्या व्यवस्थापनाने मात्र ‘कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी जाहिरात मागे घेत आहे’, असे सांगून हिंदूंनाच आतंकवादी ठरवत, क्षमा मागायचीही उदारता दाखवली नाही. तनिष्कच्या व्यवस्थापनाने आता फ्रान्समध्ये काय झाले ते लक्षात घेऊन हिंदूंनी दाखवलेल्या सहिष्णुतेविषयी किमान आभार मानायला हरकत नाही. तनिष्कच्या पाठोपाठ ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेवर बॉम्बफेक चालू केली आहे. हिंदू त्याला वैध मार्गाने विरोध करत आहेत; पण त्याची नोंद घेण्याएवढे बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते उदार नाहीत. म.फि. हुसेनने देवतांची नग्न, संभोग करतांनाची आदी अश्‍लील चित्रे रेखाटली, तेव्हाही हिंदूंनी लोकशाही मार्गानेच विरोध दर्शवला होता. आपण केलेली चूक अक्षम्य आहे आणि त्यात आपल्याला शिक्षा होण्यासमवेतच आपली आर्थिक हानी होऊ शकते, नावलौकिकाला हानी पोचू शकते, हे समजल्यामुळे हुसेन भारताबाहेर पळून गेला होता; पण हुसेनच्या जिवाला भारतात धोका असल्याचे चित्र त्याच्या समर्थकांनी उभे केले होते. या समर्थकांनीही फ्रान्समध्ये प्रेषितांच्या चित्रावरून शिक्षकाचा शिरच्छेद कसा करण्यात आला आणि तो करणारा हुसेन यांचाच धर्मबांधव होता, हे लक्षात घ्यावे.

भारतातील सनातन धर्मात ‘उदारमतवाद’ आधीपासूनच आहे. त्यामुळेच येथे अनेक संप्रदाय, विचारधारा जन्माला आल्या, तरी त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण न होता त्या टिकल्या आणि लोकांना त्यांच्या प्रकृतीनुसार धर्माचरण करणे सोयीचे झाले. हिंदूंना कुणी पुरोगामित्व, उदारमतवाद शिकवण्याची आवश्यकता नाही. आता राहिला भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ! आतापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्याच श्रद्धास्थानांवर विविध माध्यमांतून सर्वाधिक प्रमाणात घाला घालण्यात आला आहे. न्यायालयानेही हल्लीच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागणे नव्हे’, असे एका पक्षकाराला ठणकावले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असाव्यात, हेच खरे ! जगभरात नास्तिकता वाढत आहे, तर दुसर्‍या बाजूने इस्लामी कट्टरतेने जोर पकडला आहे. या दोन्ही गोष्टी जगासाठी घातकच आहेत.