साधकांनो, घोर आपत्काळ समोर असतांना सामाजिक माध्यमांसारख्या गोष्टींचा अनावश्यक वापर करून वेळ वाया घालवू नका !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

सध्या मनुष्य ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘टेलीग्राम’, ‘इन्स्टाग्राम’ इत्यादींसारख्या सामाजिक माध्यमांचा गुलाम होत चालला आहे. याद्वारे तो त्याच्या जीवनातील अमूल्य वेळ अनावश्यक आणि निरर्थक गोष्टी पहाण्यात व्यय करत आहे.

(सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे

१. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेश सातत्याने पाहिल्याने होणारे दुष्परिणाम

१ अ. वेगवेगळे गट बनवणे : ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वसाधारणपणे खालील संबंधितांचे गट बनवले जातात. यांत पुढील प्रकारे गट दिसून येतात.

१. कुटुंबियांचा गट (माहेरचे लोक, सासरचे, भावंड इत्यादी.)

२. शाळेतील मित्र-मैत्रिणींचा एक गट

३. कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींचा निराळा गट

४. कार्यालयातील मित्र-मैत्रिणींचा आणखी एक गट

५. सहकार्‍यांचा एक गट

६. गृहनिर्माण संकुलातील सभासदांचा एक गट

७. कुठे सहलीला गेेले असल्यास तेथे मैत्री झालेल्यांचा एक गट

८. आवडीच्या विषयाशी संबंधित व्यक्तींचा उदा. आधुनिक वैद्य, विविध विषयांतील कलाकार, विक्रेते, एका गावातील अशांचा एक गट, इत्यादी.

असे अनेक गट बनवले जातात. या प्रत्येक गटात अनुमाने १० ते १०० किंंवा त्यापेक्षाही अधिक जणांचा सहभाग असतो.

प्रत्येक गटातील कुणी ना कुणी काहीतरी संदेश पाठवतच असतो. पहाणार्‍यालाही याची सवय झालेली असते. तोही थोड्या थोड्या वेळाने ‘काही संदेश आले का ?’, ते पहात असतो.

१ आ. गटांमध्ये सतत कार्यरत असणे : अनेक जण वेळ घालवण्यासाठी या गटांमध्ये ‘सुप्रभात’, ‘शुभ रात्री’, ‘शुभ सोमवार’.., ‘चतुर्थीच्या किंवा एकादशीच्या शुभेच्छा’, ‘विविध प्रकारची सुवचने’, ‘विविध विषयांवरील विनोद’, ‘कविता’, ‘भाषणे’, ‘अनेक विषयांवरील चलत्चित्रे’, ‘विविध कार्यक्रमांची छायाचित्रे’, इत्यादी दिवसभर पाठवत असतात. ‘नवीन-जुनी गाणी’ आणि अनेक ‘प्रकारची चांगली-वाईट छायाचित्रे’ यांची सतत देवाण-घेवाण अखंडपणे चालू असते. सध्याचे आणखी एक मोठे वेड, म्हणजे ‘स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र (सेल्फी)’ सतत सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करत रहाणे’, हे आहे. (‘अशा प्रकारच्या पोस्टमुळे अनेक मुलींच्या छायाचित्रांचे अपलाभ घेऊन, त्यांच्याशी मैत्री वाढवून, त्यांना फसवल्याचेही अनेक प्रकार झाल्याचे प्रतिदिन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत आहे.’ – संकलक)

१ इ. गटात सहभागी असण्याविषयी चढाओढ असणे : अनेक ठिकाणी ‘आपला संदेश लवकरात लवकर पुढे गेला पाहिजे’, याची चढाओढ लागलेली असते. बरेच जण सतत ‘ऑनलाईन’ असतात. तुम्ही संदेश पाठवला की, लगेच तुम्हाला तुमचा संदेश समोरच्या व्यक्तीने पाहिल्याची निळी खूण दिसते. जणू काही ते तुमच्या संदेशाची वाटच पहात असतात.

२. सामाजिक माध्यमांचा अनावश्यक वापर, म्हणजे एक भयावह व्यसनच !

दारूचे किंवा अन्य व्यसने जशी असतात, तसेच हेही एक व्यसनच आहे. लहान मुले, तसेच मोठ्या व्यक्तीही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. घरातील व्यक्तींमधील आपापसातील संवाद बंद पडत आहे. यांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत आहेत, तसेच काही ठिकाणी घटस्फोटही होत आहेत. या व्यसनाने एवढे भयंकर रूप धारण केले आहे.

यात सर्वत्रचे प्रचंड मनुष्यबळ वाया जात आहे. त्यासह समाजाचेही अधःपतन होत आहे. या मोह-मायाजालात अडकून समाजाला ‘नको नको’, ते पहाण्याची इच्छा होत आहे.

‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: ।’ या उक्तीनुसार हातात आलेल्या भ्रमणभाषचा वापर लाभदायी होण्यापेक्षा हानीकारक ठरत  आहे.

३. सामाजिक प्रसारमाध्यमांच्या अनावश्यक वापरामुळे मानवावर होणारे गंभीर परिणाम

अ. सतत भ्रमणभाष वापरल्यामुळे माणसाला डोकेदुखी, मान आणि डोळ्यांच्या व्याधी इत्यादी प्रकारच्या शारीरिक व्याधी, तसेच अनेक प्रकारच्या मानसिक व्याधी होत आहेत.

आ. तो एकलकोंडा बनत चालला आहे.

इ. घरातील मुले आणि अन्य सदस्य सतत भ्रमणभाष वापरत असल्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होतात, तसेच पालक आणि पाल्य यांच्यात दुरावा निर्माण होत आहे.

ई. पालकांनी भ्रमणभाष घेऊन न दिल्यानेे आत्महत्या केलेल्या मुलाविषयीची वृत्तेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत.

उ. पती किंवा पत्नी अधिक वेळ भ्रमणभाषवर घालवत असल्याकारणाने ते घटस्फोटापर्यंतही गेले आहेत.

ऊ. प्रसारमाध्यमांच्या सततच्या वापराने माणूस सर्व बाजूंनी घेरला जाऊन त्याची कार्यक्षमताच नष्ट होत आहे.

४. साधकांनी लक्षात घ्यायची सूत्रे

४ अ. साधकांनो, ‘प्रसारमाध्यमांवरील गटांतील सहकार्‍यांना वेळ देणे’, आवश्यक नाही !

१. साधक स्थुलातून मायेचा त्याग करून साधना करतात; परंतु काही जण मात्र मनाने अशा गटात अडकलेले असतात. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. ‘विनोद, मनोरंजन, अनावश्यक लिखाण, वृत्ते इत्यादी वाचणे आणि पहाणे’, यांचा आपल्यावर एक नवीन संस्कार होत असतो. आपण नवीन विचार निर्माण करत असतो. यांमुळे आपला साधनेचा बराचसा वेळ वाया जातो.

२. अशा गटात ‘कुणाचा वाढदिवस असतो, तर कुणाला नोकरी लागते, कुणाला बढती (प्रमोशन) मिळते, तर कुणाला पारितोषिक !’ याविषयींच्या ‘पोस्ट’ असतात. आपण गटात असल्याने ‘ते पहाणे आणि त्याला प्रतिसाद देणे’, यात बराच वेळ वाया जातो, ते वेगळेच ! यात ‘कुणी आजारी असतो, कुणाचे निधन झालेले असते’, हे आपल्याला समजल्यावर त्याला प्रतिसाद द्यावा लागतो.

३. ‘आपण त्या गटात आहोत’, असे पाहिल्यावर सर्वांच्या मनात काही ना काही अपेक्षा निर्माण होतात. ‘त्या अपेक्षा पूर्ण करणे’, शक्य असतेच’, असे नाही. त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

‘साधना करतांना हे किती आवश्यक आहे’, याचा प्रत्येकाने अभ्यास करावा. आपला सर्व वेळ सत्कारणी लागला पाहिजे.

४ आ. रात्रीच्या वेळी भ्रमणभाषवरील संदेश वाचण्याने साधकांवर होणारा परिणाम

१. बर्‍याच वेळा रात्रीच्या वेळी हे संदेश पहाण्यात काही जणांचा अर्धा ते एक घंटा, तर काही जणांचा त्यापेक्षाही अधिक वेळ वाया जातो.

२. रात्री संदेश पाहिल्याने झोपेपर्यंत त्या विचारांत रहाणे होते, तर काही वेळा काही संदेशांमुळे काही जणांना ताण येतो.

४ इ. साधनेसाठी अनावश्यक असलेले संदेश, चलत्चित्र (‘व्हिडिओ’) इत्यादी पहाण्यात वेळ गेल्याने आणि त्यानंतर येणार्‍या विचारांमुळे आपल्यावर अनिष्ट शक्तींचे आवरण येते. त्या स्थितीत झोपल्यामुळे रात्रभर अनिष्ट शक्तींचा त्रास वाढतो. त्याचा परिणाम सकाळी उठण्यापासून ते दिवसभरातील सेवांवर होतो.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.४.२०२०)