नगरपरिषदेतील रिक्त पदांमुळे कर्मचारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये होत आहेत वाद !

या परिस्थितीला उत्तरदायी कोण ?

सावंतवाडी नगरपरिषद

सावंतवाडी – सावंतवाडी नगरपरिषदेतील रिक्त पदांमुळे सेवारत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कार्यभार पडत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नगरसेवक यांच्यात कामकाज करण्यावरून संघर्ष होत असून हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी नगरपरिषदेतील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. असे झाले, तरच कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण अल्प होऊन नगरसेवकांनी दिलेली जनतेची कामे मार्गी लागतील, अशी चर्चा येथे चालू आहे.

सावंतवाडी नगरपरिषद ही जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सबळ असली, तरी बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, कर आणि प्रशासन या विभागांतील अधिक पदे रिक्त असून या पदाचा कार्यभार अन्य कर्मचार्‍यांवर सोपवला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण असून त्यात कोरोना नियंत्रण कार्यक्रम राबवावा लागत असल्याने या ताणात आणखीनच भर पडली आहे.

बांधकाम विभागाचा अतिरिक्त भार नाकारला

नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता तानाजी पालव हे ३ मासांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष भिसे यांच्याकडे देण्यात आला. यासाठीचा ठराव नगरपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यावरून नगर परिषदेत सत्ताधारी असलेला भाजप आणि विरोधी पक्ष असलेली शिवसेना यांच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली होती. भिसे यांनी ‘मला बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार जमणार नाही. त्यामुळे पदावरून मुक्त करावे’, असे पत्र प्रशासनाला दिले. या पत्राचे वाचन नगराध्यक्ष परब यांनी ९ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत केले. त्यानंतर भिसे यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचा निर्णय एकमताने  घेण्यात आला.

  • पाणीपुरवठा विभाग – पाणीपुरवठा विभागातील ‘वॉल मॅन’ आणि ‘पंपचालक’ या पदांचा कार्यभार रोजंदारीवरील कर्मचार्‍यांकडे आहे, तर अभियंत्याचा कार्यभार अभियंता सुटीवर गेल्याने कर्मचारी हाकत आहेत.
  • कर विभाग – मालमत्तेचे मोजमाप घेऊन कर आकारणी करणे आणि तो कर गोळा करणे, ही नगरपरिषदेची आर्थिक बाजू हा विभाग सांभाळतो; परंतु कर निरीक्षक हे पद रिक्त असून त्याचे दायित्व कनिष्ठ लिपिकाकडे देण्यात आले आहे.
  • विद्युत विभाग – सावंतवाडी शहर, नगरपरिषदेच्या इमारती, तळ्याकाठचा परिसर, भोसले उद्यान आदींची निगा आणि देखभाल करण्यासाठी असलेले विद्युत निरीक्षक पद रिक्त असून या पदाचा कार्यभार ‘वायरमन’ पदावरील कर्मचार्‍यांवर सोपवण्यात आला आहे, तर ‘वायरमन’ पदे ठेकेदार पद्धतीने भरली जात आहेत.
  • आस्थापन प्रशासन निरीक्षक – नगरपरिषद कार्यालयाचा प्रशासकीय कारभार या पदाच्या अधिपत्याखाली येतो; परंतु हे पद रिक्त असून याचा कार्यभार ‘सभा लिपिका’कडे देण्यात आला आहे.
  • आरोग्य विभाग – या विभागाचे आरोग्य निरीक्षक हे प्रमुख पद रिक्त असून या पदाचा कार्यभार कनिष्ठ लिपिकाकडे देण्यात आला आहे. (महामारीच्या काळात अशी मुख्य पदे रिक्त ठेवणे ही दायित्वशून्यताच ! – संपादक) या विभागात आरोग्य दूत, सफाई कामगार, घंटागाडीवाले, असे कामगार आहेत, तसेच या विभागात मुकादम, मेस्त्री, स्थापत्य अभियंता, ४ लिपिक, असा मोठा कर्मचारीवर्ग आहे. शहरात कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले असून त्याला तोंड देण्यासाठी कर्मचारी गेले ६ मास झटत आहेत. सर्व कर्मचार्‍यांचे पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसूल करण्यात योगदान फार मोठे आहे; परंतु जुलै मासात देण्यात येणारी वेतनवाढ काहींना देण्यात आली, तर काहींना अद्याप दिलेली नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये अप्रसन्नता आहे.

नगरपरिषदेतील रिक्त पदांच्या समस्येवर वेळीच उपाययोजना केल्यास कर्मचारी आणि नगरसेवक यांच्यातील संघर्ष टळेल अन् कर्मचार्‍यांनाही नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बसून आंदोलन करावे लागणार नाही.