‘स्वतःच्या प्रकृतीनुरूप काळानुसार देवतेचा ‘तारक’ किंवा ‘मारक’ नामजप करा आणि नामजपातून मिळणार्‍या लाभात वृद्धी करा !

१. देवतेच्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे का आवश्यक ?

देवतेच्या विविध उपासनापद्धतींपैकी कलियुगातील सर्वांत सोपी उपासना म्हणजे ‘देवतेचा नामजप करणे’.  देवतेविषयी मनात पुष्कळ भाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; परंतु सर्वसाधारण साधकामध्ये एवढा भाव नसतो. यासाठी देवतेच्या नामजपातून देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होण्यासाठी त्या नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते.

२. देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचे महत्त्व

देवतेची तारक आणि मारक अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप, उदा. आशीर्वाद देतांनाच्या मुद्रेतील श्रीकृष्ण. देवतेचे असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदा. शिशुपालावर सुदर्शनचक्र सोडणारा श्रीकृष्ण. देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. देवतेप्रती सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी, तसेच चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती लवकर येण्यासाठी अन् वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी देवतेच्या तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. देवतेकडून शक्ती अन् चैतन्य ग्रहण होण्यासाठी आणि वाईट शक्तींचे निर्दालन करण्यासाठी देवतेच्या मारक रूपाचा नामजप आवश्यक असतोे.

भावपूर्ण आणि तळमळीने केलेल्या नामजपामुळे व्यक्तीला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण होऊ शकते. अनेकांना हे ठाऊक नसल्याने ते वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी भगताकडे जातात. भगताने केलेली उपाययोजना तात्कालिक असते; म्हणून काही काळाने वाईट शक्ती व्यक्तीला पुन्हा त्रास देऊ लागतात. तसेच भगताकडून फसवणूक होण्याचाही धोका असतो. यामुळे वाईट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी नामजप उपयुक्त आहे.

३. साधकाची ‘तारक’, ‘मारक’ आणि ‘तारक-मारक’ प्रकृती

३ अ. ‘तारक’ प्रकृती असलेल्या साधकाची काही लक्षणे

३ अ १. तारक साधना करणारा : भावपूर्ण आणि हळू आवाजात नामजप करणे, दिलेली सेवा एकमार्गी भावपूर्ण करत रहाणे इत्यादी.

३ अ २. व्यष्टी साधना करणारा (वैयक्तिक साधना करणारा) : वयस्कर साधक, रुग्ण साधक किंवा सेवेसाठी बाहेर जाऊ न शकणारा साधक यांनी घरी अथवा आश्रमात राहून नामजप करणे किंवा जमेल तेवढी सेवा करणे इत्यादी.

३ आ. ‘मारक’ प्रकृती असलेल्या साधकाची काही लक्षणे

३ आ १. मारक साधना करणारा : आवेशाने नामजप करणे, समष्टीत (सर्वांसमोर) परखडपणे बोलणे वा मार्गदर्शन करणे, साधकांना चुका सांगून त्या दुरुस्त करवून घेणे, साधकांकडून होणार्‍या चुकांकरता त्यांना प्रायश्‍चित्त घ्यायला सांगणे, स्वतःला वाईट शक्तींचा त्रास होत असतांनाही त्याच्याशी लढून सेवा वा साधना करणे इत्यादी.

३ आ २. समष्टी साधना करणारा (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करणारा) : पुढाकार घेऊन सेवा करणे, अनेक साधकांकडून सेवा करवून घेणे, समाजात अध्यात्मप्रसार करणे, धर्मसभा घेणे, स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवणार्‍यांचे सत्संग घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी.

३ इ. ‘तारक-मारक’ प्रकृती असलेल्या साधकाची लक्षणे : तारक आणि मारक अशा दोन्ही प्रकृतींचे मिश्रण म्हणजे ‘तारक-मारक’ प्रकृती. अशी प्रकृती असलेल्या साधकामध्ये सूत्र ‘३ अ’ आणि ‘३ आ’ यांतील थोडी थोडी लक्षणे आढळतात.

४. साधकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा ‘तारक’ किंवा ‘मारक’ नामजप करणे महत्त्वाचे

साधकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा तारक किंवा मारक नामजप केल्यास त्याला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो.

वर दिलेल्या ‘तारक’ आणि ‘मारक’ प्रकृती असलेल्या साधकाच्या लक्षणांवरून ‘स्वतःची प्रकृती कोणती’, हे ठरवावे अन् त्यानुसार तारक किंवा मारक नामजप करावा. ‘तारक-मारक’ प्रकृती असलेल्या साधकाने तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि ‘ज्या नामजपामध्ये मन अधिक रमते’, तो नामजप करावा. एखादा नामजप वा साधना करत नसेल, त्यानेही तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि जो नामजप आवडेल तो करावा.

५. सनातन-निर्मित ‘सप्तदेवतांचे तारक आणि मारक नामजप’ यांचे महत्त्व

५ अ. काळानुसार नामजपांची निर्मिती : कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून हे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तारक अथवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.

५ आ. काळानुसार वाढत असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त असलेले नामजप : वर्ष २०२३ मध्ये सात्त्विक आणि आदर्श असे ‘हिंदु राष्ट्र’ (ईश्‍वरी राज्य) स्थापन होणार आहे. ते होऊ नये यासाठी वातावरणातील वाईट शक्ती पूर्ण बळ एकवटून विरोध करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. मारक भावातील नामजप हे काळानुसार परिणामकारक असल्याने तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्तींना या नामजपादी उपायांच्या दृष्टीने चांगला लाभ होऊ शकतो. यासाठी असे श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, श्री गणपति, शिव, हनुमान आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांचे मारक, तसेच तारक नामजपही ध्वनीमुद्रित केले आहेत.

५ इ. आत्यंतिक रुग्ण आणि वास्तूशुद्धी यांसाठीही नामजप लाभदायक : आत्यंतिक रुग्ण असलेल्या व्यक्तींना स्वतः नामजप करणे शक्य नसेल, तर त्यांनी हे नामजप ऐकल्यासही त्यांना लाभ होईल. सध्या वाईट शक्तींच्या वाढत्या आक्रमणांमुळे वास्तूवरही परिणाम होऊन ती रज-तमाने दूषित होते. नामजप दिवसभर घरात लावून ठेवल्यास वास्तूशुद्धी होऊन घरातील वातावरणही प्रसन्न होण्यास साहाय्य होईल.

५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नामजपांमागे असलेला संकल्प : जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार नामजपांची निर्मिती करवून घेतली आहे. यामध्ये त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्‍चितच साहाय्य होईल.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मारक नामजपाची सांगितलेली वैशिष्ट्ये

अ. धर्मसभेत घोषणा देतांना मानसिक स्तरावरील रजोगुण वाढतो. या नामजपांत मारक भाव असल्याने तेे रज-सत्त्वप्रधान असले, तरी ते ऐकल्यावर मानसिक स्तरावरील रजोगुण न वाढता ऐकणार्‍याला यातून आध्यात्मिक रजोगुणाचा अनुभव घेता येईल !

आ. मारक भावातील प्रत्येक नामजप करतांना देवतेच्या नामातील अक्षरावर जोर दिला आहे.

इ. आपण हे नामजप अधिकाधिक ९० टक्क्यांपर्यंत (अंतिम) करू शकू. उर्वरित १० टक्के देव पूर्ण करून घेईल. आपण हे नामजप आताच १०० टक्के पूर्ण केले, तरी समाजाला आताच्या स्थितीला ते पेलवणार नाहीत. याचा अर्थ असा की, सध्या समाजाची सात्त्विकता अल्प असल्यामुळे जर नामजप १०० टक्के पूर्ण केले, तर त्या नामजपांतील चैतन्य सहन न झाल्याने बर्‍याच जणांना नामजपांमुळे त्रासही होऊ शकतो.

ई. समाजातील नामजप करणार्‍या ९० टक्के व्यक्तींचा कल भावपूर्ण नामजप करण्याकडेच असतो. असे असले, तरी अन्य १० टक्के व्यक्ती, ज्यांना मारक भावातील नामजप उपयुक्त आहे, ते या नामजपापासून वंचित राहू नयेत, यासाठीही ते ध्वनीमुद्रित केले आहेत.

सध्या समाजासाठी उपलब्ध असलेले नामजप आणि तारक-मारक नामजप करण्याची किंवा ऐकण्याची पद्धत

सध्या समाजासाठी श्रीराम आणि दत्त या देवतांचे ‘श्रीराम जय राम जय जय राम।’, ‘श्री गुरुदेव दत्त ।’, ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ आणि ‘ॐ’ हे तारक अन् मारक नामजप उपलब्ध आहेत. अन्य देवतांचे नामजप लवकरच उपलब्ध होतील.

अ. वरील तारक आणि मारक नामजप आरंभी प्रत्येकी अर्धा घंटा करावे किंवा ऐकावेत.

आ. आध्यात्मिक त्रास असलेल्यांना या नामजपांपैकी जो नामजप करतांना किंवा ऐकतांना अधिक त्रास जाणवत असेल, त्यांनी नामजपादी उपाय म्हणून तो ऐकावा.

इ. आध्यात्मिक त्रास नसलेल्यांना या नामजपांपैकी जो नामजप करतांना किंवा ऐकतांना अधिक चांगले जाणवत असेल, त्यांनी नामजपादी उपाय म्हणून तो नामजप ऐकावा.

हे नामजप आमचे संकेतस्थळ तसेच ‘चैतन्य अ‍ॅप’ या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण यांचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपांविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त, स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

हे नामजप पुढील लिंकवर उपलब्ध आहेत :

https://www.sanatan.org/mr/audio-gallery

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप डाऊनलोड करा

https://www.sanatan.org/Chaitanyavani

हे नामजप ऐकतांना आपणास काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला अवश्य कळवा. यासाठी आमचा पत्ता आहे [email protected]

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.