आमदार सुधीर गाडगीळ यांची अवकाळीग्रस्त भागाची पहाणी 

अवकाळीग्रस्त भागाची पहाणी करतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ

सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी बिसूर, खोतवाडी आणि नांद्रे या गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने हानी झालेल्या पिकांची पहाणी केली. या हानीचे जागेवर जाऊन प्रामाणिकपणे पंचनामे करावेत आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, अशी सूचना श्री. गाडगीळ यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना केली.
सांगली शहर आणि जिल्ह्याला या आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सहस्रो हेक्टरवरील शेतीची कोट्यवधींची हानी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी नांद्रेपासून खोतवाडी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिके, घरे, रस्ते, तसेच हानीग्रस्त पुलांची पहाणी केली. स्थानिक शेतकरी, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. शिवाजी डोंगरे, सर्वश्री विक्रम पाटील, राहुल सकळे, किरण पाटील, सतीश नीलकंठ, बजरंग भगत, महेश पाटील, महादेव पाटील, संतोष पाटील यांसह अन्य उपस्थित होते.