श्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशिदीसाठी सोडणार नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीकृष्ण जन्ममूभी मुक्तीचा संघर्ष’ विषयावर विशेष ऑनलाइन परिसंवाद

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मुंबई – श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी १२.१०.१९६८ चा जो तडजोडीचा करार करण्यात आला होता, त्यावर ‘श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्ट’ने स्वाक्षरी केली नव्हती, त्यामुळे तो करार अवैध आहे. त्यामुळे जिल्हा न्यायाधिशांनी निकालावर म्हटले आहे की, ‘भगवान आणि भक्त दोघेही या प्रकरणी खटला प्रविष्ट करू शकतात.’ तरी दिवाणी न्यायालयाचा निकाल रहित ठरून जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी चालू होईल. येथील १३.३७ एकर भूमी ही पूर्ण भूमी श्रीकृष्णजन्मभूमीची आहे. त्यातील एक इंचही भूमीवर अवैध मशीद राहू शकत नाही. ती अवैध मशीद हटवायला हवी. श्रीकृष्णभूमीसाठी आमचा संघर्ष चालूच ठेवू, असे ठाम प्रतिपादन या प्रकरणी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीकृष्ण जन्ममूभी मुक्तीचा संघर्ष’ विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन परिसंवादात ते बोलत होते.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले की,
१. औरंगजेबाच्या लेखी आदेशानुसार सध्याचे मथुरा येथील मंदिर हेच भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचे लेखी पुरावे आजही उपलब्ध आहेत.
२. स्वातंत्र्यपूर्व काळातही हिंदूंनी अनेक वेळा श्रीकृष्णजन्मभूमीचा खटला जिंकला होता. वर्ष १९५१ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर सेवा ट्रस्ट’ची अधिकृत स्थापना केली होती. तरी वर्ष १९५६ मध्ये काँग्रेसच्या लोकांचा भरणा असलेल्या ‘श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ’ या खोट्या संघाची स्थापना करण्यात आली. या संघाने न्यायालयात ‘ही भूमी आम्हाला मिळाली’, अशी याचिका प्रविष्ट केली.
३. पुढे या याचिकेवर न्यायालयात मुस्लिम पक्षकार आणि ‘श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ’ यांच्यात तडजोड होऊन ‘मूळ मंदिराची जागा मशिदीकडेच राहील’, असा निकाल वर्ष १९६८ मध्ये देण्यात आला. तो निकाल पूर्णत: अवैध आहे.
४. पुरातत्त्व विभागाने श्रीकृष्ण मंदिराला लागून असलेल्या मशिदीच्या खाली खोदकाम केल्यास येथेही मूळ अवशेष निश्‍चितच मिळतील.
या विशेष परिसंवादाचा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमातून १९ सहस्र ६७७ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर ३९ सहस्र २१९ लोकांपर्यंत पोचला. या विषयावर #Reclaim_KrishnaJanmabhoomi हा ‘हॅशटॅग’ ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडमध्ये होता.

…हा तर श्रीकृष्णजन्मभूमी आंदोलनाच्या लढ्यातील विजयाचा आरंभ ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका अयोग्य प्रकारे रहित करण्यात आली होती. आता हीच याचिका जिल्हा न्यायाधिशांनी स्वीकारली आहे आणि खटला चालवण्यात येणार आहे. ही गोष्ट आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाची असून हा तर श्रीकृष्णजन्मभूमी आंदोलनाच्या लढ्यातील विजयाचा आरंभच आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रकरणी व्यक्त केली.