व्यक्तीगत माहिती संकेतस्थळावरून प्रसिद्ध केल्याने ५० लाखांची हानीभरपाईची मागणी

मुंबई – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्यक्तीगत माहिती संकेतस्थळावरून प्रसिद्ध केल्याने आपल्याला त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ५० लाख रुपये हानीभरपाई मिळावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केली आहे. माहिती अधिकाराखाली माहिती मागणार्‍याचे नाव आणि त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येते; मात्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली व्यक्तीगत माहिती देण्यात आली आहे.

ही माहिती हटवण्याचे आदेश देण्याची मागणी गोखले यांनी या याचिकेत केली आहे. या याचिकेच्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागणार्‍या सगळ्यांचाच वैयक्तिक तपशील अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध केला जातो की, केवळ याचिकाकर्त्यांचाच तपशील प्रसिद्ध करण्यात आला, अशी विचारणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केली. तसेच त्याविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिला आहे.