मुंबईमध्ये दारूची दुकाने रात्री ११.३० पर्यंत चालू ठेवण्यास अनुमती

दारूच्या दुकानांना मोकळीक देणार्‍या सरकारने मंदिरेही लवकरात लवकरात उघडावीत, ही भाविकांची अपेक्षा !

मुंबई – मुंबईमधील उपाहारगृहे, फूड कोर्ट आणि दारूची दुकाने सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत, तर अन्य व्यापारी आस्थापने सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत चालू ठेवण्यास मुंबई महापालिकेकडून अनुमती देण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने मुंबईमधील भाजी बाजार, बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली ठेवण्यास अनुमती दिली होती. तसेच उपाहारगृहे, फूड कोर्ट, मद्यालये एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने चालू करण्यास अनुमती देण्यात आली होती. या आस्थापनांच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रांमधील निर्बंध कायम आहेत. व्यापारी आस्थापनांना सामाजिक अंतर, मुखपट्टी आणि सॅनिटायझर यांचा वापर आदी नियमांचे पालन बंधनकारक आहे. राज्य सरकार आणि पालिका यांनी दिलेल्या आदेशांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५’मधील कलम ५१ ते ६० आणि ‘भारतीय दंड संहिता, १८६०’मधील कलम १८८ आणि लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.