रेल्वे प्रवासात मास्क न घातल्यास कारागृहात जावे लागणार

मुंबई – रेल्वे प्रवासात मास्क न घालणे, शारीरिक अंतर न ठेवणे या नियमांचे पालन न करणार्‍या प्रवाशांना कारागृहाची शिक्षा होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले, ‘‘कोरोनाकाळात सहप्रवाशाला धोका उत्पन्न होईल, अशा प्रकारचे वर्तन केल्यास आणि त्याची तक्रार आल्यास किंवा प्रत्यक्षात निदर्शनास आल्यास त्या प्रवाशावर कारवाई केली जाणार आहे. पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून पाच लाखांपेक्षा अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करतात; परंतु प्रवासादरम्यान मास्क परिधान न करणे, पादचारी पूल, फलाटावरून चालतांना शारीरिक अंतर ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसते. लोकल प्रवासातही दरवाजा अडवला जातो. याविरोधात रेल्वे कायद्यानुसार कारवाईची चेतावणी मध्य रेल्वेकडून दिली आहे.

प्रवाशाने पहिल्यांदा गुन्हा केला, तर कलम १४५ नुसार २५० रुपये दंड ठोठावला जाईल. पुन्हा गुन्हा केल्यास कलम १५४ नुसार एक वर्षापर्यंत कारागृहाची शिक्षा होऊ शकते, तर कलम १५३ नुसार पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सध्या उद्घोषणा करून किंवा प्रवाशांना प्रत्यक्षात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, याची माहिती दिली जात आहे. पुढील आठवड्यापासून किंवा त्यानंतर या कारवाईला रेल्वे पोलिसांकडून प्रारंभ होणार आहे.