समन्वयाच्या अभावामुळे महिलांचा लोकल प्रवास लांबणीवर

जे प्रशासन संपतकाळात समन्वय ठेवू शकत नाही, ते आप्तकाळात जनतेची काळजी घेऊ शकेल का ?

मुंबई – राज्य सरकार आणि रेल्वे मंडळ यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे १७ ऑक्टोबरपासून चालू होणारा महिलांचा लोकल प्रवास लांबणीवर पडला आहे.

राज्य सरकारने १६ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील महिलांना लोकल प्रवास करण्यास १७ ऑक्टोबरपासून अनुमती देण्यात येत असल्याचे पत्रक काढले होते. हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवून ‘महिलांना प्रवासाची मुभा द्यावी’, अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे १७ ऑक्टोबर या दिवशी अनेक महिला रेल्वे स्थानकावर गेल्या; मात्र त्यांना अद्याप प्रवासाला अनुमती देण्यात आली नसल्याचे समजले.

शासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.राज्य सरकारचे अधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक होईल. त्यात सर्व गोष्टींचा विचार होऊन मग निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.