कोल्हापूर येथे भावपूर्ण वातावरणात श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात १७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी तोफेची सलामी देऊन श्रीपूजक शेखर मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर, सुहास जोशी, किरण लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना झाली. मंदिर भाविकांसाठी खुले नसल्याने शहरात १० ठिकाणी मोठे स्क्रीन उभारण्यात आले आहेत. यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होणार आहे. याच समवेत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या संकेतस्थळावर लाईव्ह दर्शन उपलब्ध आहे. उत्सवकाळात ९ दिवस ९ पूजा बांधण्यात येणार आहेत.

श्री महालक्ष्मी देवीची महाशक्ती कुण्डलिनी स्वरूपातील पूजा

प्रतिपदेला श्री महालक्ष्मीदेवीची महाशक्ती कुण्डलिनी स्वरूपातील पूजा

वर्ष २०२० मध्ये करवीरमहात्मातील निवडक स्तोत्रांंमधील होणारे दर्शन ही संकल्पना राबवली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्री महालक्ष्मीदेवीचे व्यापक आणि आदिशक्ती स्वरूपच प्रकट होतांना दिसते. कधी ती शिवाचे संहारकार्य करतांना दिसते, तर कधी ब्रह्माचे निर्माण करतांना, तर कधी विष्णूचे पालनकार्यही करतांना दिसते. ब्रह्मा-विष्णु-शिव यांची ती जननी आहे आणि आत्मशक्ती आहे. अशा महाशक्तीची करवीर महात्मातील निवडक स्तोत्रे, मूळ संस्कृत संहिता आणि मराठी आवृत्ती या निमित्ताने श्री महालक्ष्मीच्या भक्तांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.

प्रतिपदेला श्री महालक्ष्मीदेवीची महाशक्ती कुण्डलिनी स्वरूपातील पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्‍वर आणि मकरंद मुनीश्‍वर यांनी बांधली.

मंदिर परिसरात  २०० पोलीस तैनात

प्रतिवर्षी किमान १० लाख भाविक श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून २०० पोलिसांसह ५० होमगार्डची नेमणूक मंदिर परिसरात करण्यात आली आहे. कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवरात्र काळात प्रतिदिन श्री महालक्ष्मीदेवीची पालखी मिरवणूक होते. ही पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा गरुड मंडपात विराजमान होते. त्यामुळे रात्री ७.३० ते १० वाजेपर्यंत जोतिबा रस्ता नागरिकांसाठी बंद केला जाणार आहे.

जोतिबा देवस्थान येथेही भावपूर्ण वातावरणात नवरात्र प्रारंभ

श्री जोतिबा देवाची बैठक स्वरूपातील सालंकृत पूजा

जोतिबा (तालुका पन्हाळा) – श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी म्हणजेच जोतिबा देवस्थान येथे सनई, तुतारी, ढोल, ताशे, शिंग या वाद्यांच्या गजरात मुख्य मंदिरात घटस्थापना झाली. सकाळी श्री जोतिबा देवाची बैठक सालंकृत पूजा बांधण्यात आली. सर्व धार्मिक विधी झाल्यावर धुपारती सोहळा झाला. आरती मुख्य मंदिरात जातांना तोफेची सलामी देण्यात आली.