शेतकरी, तसेच व्यापारी आणि नागरिक यांच्याही घरांचे तातडीने पंचनामे करून हानीभरपाई द्या ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपचे अन्य पदाधिकारी

सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – गेल्या ५ दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांचे खरीप पीक वाया गेले, तसेच व्यापारी-सामान्य नागरिक यांनाही मोठा फटका बसला. त्यामुळे अवेळी पडलेल्या पावसाने बाधित शेतकरी, व्यापारी आणि नागरिक यांच्या घरांचे तातडीने पंचनामे करून हानभरपाई द्या, अशा मागणीचे निवेदन भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष श्री. धीरज सूर्यवंशी, सर्वश्री गणपती साळुंखे, किरण भोसले उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपचे अन्य पदाधिकारी

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, द्राक्षबागा, फळबागा आणि ऊस यांची प्रचंड हानी झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात, तसेच मिरज पूर्व भागात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे या शेतकर्‍याला आधार देण्याची आवश्यकता आहे. व्यापार्‍यांची हानी झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ते आर्थिक संकटात सापडले आहेत. तरी प्रत्यक्ष बांधावर शेतात जाऊन हानीची पहाणी करून शेतकर्‍यांना रोख अनुदान द्यावे, तसेच पुराच्या पाण्याने ज्या नागरिकांच्या मालमत्तेची हानी झाली, त्यांचे पंचनामे करून त्यांनाही रोख अनुदान द्यावे.