तुळींज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यात पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांतील आरोपीचा वाढदिवस साजरा 

गुन्हेगारांशी हितसंबंध ठेवणारे पोलीस गुन्हेगारी कशी रोखणार ?

मुंबई – पालघर जिल्ह्यातील वसई येथील तुळींज पोलीस ठाण्यात अनेक गंभीर आरोप असलेल्या सचिन गाला या आरोपीचा वाढदिवस पोलिसांनी ‘केक’ कापून साजरा केला. याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर समाजातून मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. त्यानंतर वरिष्ठांनी या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. (अशा प्रकारे गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणारे पोलीस गुन्हेगारी कधीतरी रोखू शकतील का ? यातून ‘पोलीस गुन्हेगारीला पाठीशी घालतात’, असे जनतेला वाटल्यास चुकीचे ते काय ? -संपादक)
सचिन गाला याच्यावर फसवणूक, अवैध बांधकाम, भूमी बळकावणे आदी अनेक गंभीर आरोप आहेत. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस्. पाटील आणि अन्य पोलीस ‘केक’ कापून आणि टाळ्या वाजवून सचिन गाला याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. तसेच त्याला केक भरवत असल्याचे दिसत होते.